"कोणाचाही पराभव होऊ शकतो हे..."; ठाकूरांकडून सत्ता खेचणाऱ्या स्नेहा दुबेंनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:00 PM2024-11-25T21:00:20+5:302024-11-25T21:05:48+5:30
भाजपच्या स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला आहे
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. वसई विरारमध्येही गेली ३५ वर्षे आमदार हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता होती. वसईतून हितेंद्र ठाकूर आणि नालासोपारातून क्षितिष ठाकूर हे सहज निवडून येत होते. क्षितिज ठाकूर यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला तर हितेंद्र ठाकूर यांनी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. पण यंदाचा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे दोन्ही बालेकिल्ले भाजपाने काबीज केले आहेत. कधी न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांना यंदा एका नवख्या महिला उमेदवाराने पराभवाची धूळ चारली. स्नेहा दुबे असे या भाजपच्या आमदाराचे नाव आहे.
भाजपच्या स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला आहे. १९९० मध्ये वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यंदाच्या तिरंगी लढतीत स्नेहा पंडित-दुबे यांना हिंतेद्र ठाकूर यांचा पराभव केल्याने त्या जायंट किलर ठरल्या आहेत. स्नेहा पंडित दुबे यांना ७७,५५३ तर हितेंद्र ठाकूरांना ७४,४०० मते मिळाली. वसईच्या लोकांनी परिवर्तन करायचं ठरवल्याने मी निवडणूक जिंकली असल्याचे स्नेहा दुबे यांनी म्हटलं. एबीपी माझाशी बोलताना स्नेहा दुबे यांनी याबाबत भाष्य केलं.
“जनतेने ठरवलं की कोणाचाही पराभव होऊ शकतो हे वसईच्या विजयाचे उत्तम उदाहरण आहे. जनता ही जनार्दन असते. गेल्या ३५ वर्षांत वसईचा विकास खुंटला होता. त्यामुळे वसईच्या लोकांनी ठरवलं होतं की वसईत परिवर्तन करायचं. मतदार बोलून दाखवत नसले तरीही प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांमध्ये फिरत होते तेव्हा मला जाणवत होतं की वसईच्या लोकांना बदल हवाय ही लढाई वसईच्या जनतेने सुरू केली होती आणि वसईची जनता ही लढाई जिंकली आहे”, असं स्नेहा दुबे यांनी म्हटलं.
"एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मोलाची साथ दिली. भाजपचं पाठबळ कायमच राहिलं आहे. तसंच, आरएसएसनेही पाठिंबा दिला. आमच्यामागेही आरएसएस खंबीरपणे उभी होती. श्रमजीवी संघटनेचं खूप मोठं योगदान आहे," असंही स्नेहा दुबे म्हणाल्या.
"राजकारणात कधी येईन हा विचार केला नव्हता. २० वर्षे समाजकारणात सक्रिय आहे. संघटनेचंच काम करत राहिले. पण जेव्हा जबाबदारी येते, त्यावेळी मागे हटायचं नाही हे मी आई बाबांकडून शिकले आहे. लढाईची वेळ येते तेव्हा परिणामांचा विचार करायचा नसतो. पण वसईच्या जनतेने पाठिंबा देऊन अशक्य अशी लढाई जिंकली," असं स्नेहा दुबे म्हणाल्या.