Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:23 PM2024-11-23T15:23:08+5:302024-11-23T15:25:18+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विनोद तावडेंवर गंभीर आरोप करून त्यांना चार तास घेणारे ठाकूर पिता-पुत्र यांचा पराभव झाला असून, केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 results bjp sneha dubey pandit win and hitendra thakur lost in vasai and rajan naik took wining lead of 37 thousand vote against kshitij thakur in nalasopara | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष ०६ जागांवर आघाडीवर आहेत. तर अनेक ठिकाणे अंतिम निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेलात घेरले. चार तास मोठा राडा झाला होता. विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर पराभूत झाल्याचे चित्र आहे. 

Watch Live Blog >>

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी नालासोपारा-विरार येथे बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटेल विवांता येथे विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांची बैठक सुरू होती. तितक्यात तिथे बविआचे कार्यकर्ते पोहोचले आणि विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा मोठा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे पोहोचले. एका बॅगेतून काही डायऱ्या आणि त्यातील तपशील मीडियासमोर खुले करत ती बॅग विनोद तावडे यांची असल्याचा दावाही केला. विनोद तावडे यांना घेराव घालून तिथेच अडकवून ठेवले. त्यानंतर लगेचच हितेंद्र ठाकूर तेथे पोहोचले. त्यानंतर विनोद तावडे ५ कोटी घेऊन वाटायला आले होते, अशी भाजपातून टीप मिळाली होती. २५ वेळा फोन करून तावडेंनी बाहेर काढण्याची विनंती केली होती, असा मोठा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. तब्बल चार तासांनी विनोद तावडे हितेंद्र ठाकूर यांच्याच कारमध्ये बसून तिथून रवाना झाले. यानंतर यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले! 

वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर उभे होते. त्यांच्याविरोधात भाजपाने स्नेहा दुबे पंडित यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या सगळ्या २६ फेऱ्या पार पडल्यानंतर स्नेहा दुबे पंडित यांना तब्बल ७७ हजार २७९ मते मिळाली. तर हितेंद्र ठाकूर यांना ७४ हजार ००४ मते मिळाली. त्यामुळे ३ हजार २७५ मतांनी स्नेहा दुबे पंडित यांना विजयी आघाडी मिळवली आहे. वसई मतदारसंघात निवडणूक आयोगाकडून स्नेहा दुबे पंडित यांच्या विजयाची केवळ घोषणा होणे बाकी आहे. कारण सगळ्या राऊंडची मतमोजणी झाली आहे. तर वसई मतदारसंघात तिसऱ्या स्थानी असलेल्या विजय गोविंद पाटील यांना ६१ हजार ८७४ मते मिळाली आहेत.

नालासोपारा येथे राजन नाईक यांना ३४ हजार ३२३ मतांची आघाडी

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात क्षितिज ठाकूर यांना बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर, भाजपाने राजन नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. नालासोपारा मतदारसंघात १९ पैकी १८ राऊंड झाले आहेत. यामध्ये भाजपाचे राजन नाईक यांना १ लाख ६४ हजार २४३ मते मिळाली आहेत. तर क्षितिज ठाकूर यांना १ लाख २७ हजार २३८ मते मिळाली आहे. क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात राजन नाईक यांनी ३७ हजार ००५ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजन नाईक यांची ही विजयी आघाडी असल्याचे सांगितले जात आहे. तर नालासोपारा मतदारसंघात तिसऱ्या स्थानी विनोद मोरे असून, त्यांना १६ हजार ८५६ मते मिळाली आहेत.

संस्थान खालसा, वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

१९९० नंतर हितेंद्र ठाकूर चारवेळा आमदार झाले. २००९ मध्ये विवेक पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला होता. परंतु, त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपला वरचष्मा सिद्ध केला. २०१९ मध्ये हितेंद्र ठाकूर आमदार झाले. क्षितिज ठाकूर यांच्याबाबत बोलायचे झाल्यास २००९ पासून सलग तीन वेळा ते निवडून आले होते. बहुजन विकास आघाडीकडे वसई विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि या भागातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे. एकेकाळी, शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी हितेंद्र ठाकूर यांची ओळख होती.

दरम्यान, मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना बविआचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजप उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बविआला मोठा धक्का बसला. तसेच बहुजन विकास आघाडीचे नेते आणि पक्ष प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय भाजपाच्या वाटेवर जाण्याची तयारी करत होते. तो रागही हितेंद्र ठाकूर यांच्या मनात होता. तसेच क्षितिज ठाकूर यांचा नालासोपाऱ्यातील प्रभाव कमी होऊन ही निवडणूक अटीतटीची होणार तसेच राजन नाईक 'टफ फाइट' देतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. त्यासाठीच विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप करून वातावरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न बविआकडून करण्यात आला की काय, अशी चर्चा सोशल मीडियात संपूर्ण दिवस रंगली होती. एवढा राडा झाल्यानंतर वातावरण फिरेल की काय, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, या सर्व परिस्थितीला छेद देत मतदारांनी भाजपा उमेदवारांवर विश्वास दाखवला. 
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 results bjp sneha dubey pandit win and hitendra thakur lost in vasai and rajan naik took wining lead of 37 thousand vote against kshitij thakur in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.