गत वर्षात महाराष्ट्रात ८८ पत्रकारांवर हल्ले
By Admin | Published: January 9, 2017 06:15 AM2017-01-09T06:15:28+5:302017-01-09T06:15:28+5:30
पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून
विक्रमगड : पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून यामध्ये ८८ पत्रकार जखमी झाले आहेत. सरासरी दर चार दिवसाला राज्यात एका पत्रकारावर हल्ला झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे संकलित झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. १ जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१६ या पाच वर्षांच्या काळात राज्यात ३४१ पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हे प्रमाण अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत जास्त आणि चिंता वाटावी एवढे आहे. आणखी किती पत्रकारांची डोकी फुटल्यावर सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे? असा सवाल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे.
२०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात ८८ पत्रकार जखमी तर झाले आहेतच त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पत्रकारांना धमक्या देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या २४ घटना घडलेल्या आहेत. शिवाय पत्रकारांवर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, सारखे गंभीर आणि अजामिनपात्र खोटे गुन्हे दाखल करण्याच्या २२ घटना घडल्या आहेत. याच कालावधीत एका पत्रकाराचे अपहरण झाले असून त्याची नोंद पोलिसात झालेली आहे. वेगवेगळ्या कारणांनी ६ पत्रकारांनी आत्महत्या केल्या असून १४ पत्रकारांचे अकाली निधन झाले आहे. माध्यमातील या सर्व घटना माध्यमात काम करणाऱ्यसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत.
समितीने २०१२ पासूनची आकडेवारी दिलेली आहे. २०१२ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्या. २०१३ मध्ये त्यात मोठीच वाढ होऊन ती संख्या ६५ पर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही. उलट ते वाढले. २०१४ मध्ये ६६ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१५ मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि हल्ल्यांची संख्या ७७ वर पोहोचली तर २०१६ मध्ये ८८ पत्रकार जखमी झाले.
(वार्ताहर)