Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात ६८ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:21 AM2019-10-22T01:21:55+5:302019-10-22T01:22:33+5:30
Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात सकाळी काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसली. दुपारच्या उन्हात ही गर्दी आसेरलेली दिसली तर संध्याकाळी मात्र मतदान केंद्रे गर्दीने फुललेली दिसली
बोईसर : बोईसर मतदारसंघात सकाळी काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसली. दुपारच्या उन्हात ही गर्दी आसेरलेली दिसली तर संध्याकाळी मात्र मतदान केंद्रे गर्दीने फुललेली दिसली. येथे सरासरी ६८ टक्के मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी व्यक्त केला.
येथे बविआचे राजेश पाटील, सेनेचे विलास तरे आणि भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढणारे संतोष जनाठे यांच्यातच खरी लढत आहे.
५ मतदानकेंद्रात व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी मतदान खोळंबले होते. मतदानकेंद्रातील मतदारांच्या अनुक्रमांकांमध्ये तफावत असल्याने मतदान करताना मतदारांना त्रास झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला. ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले तर शेवटच्या दोन तासात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रावर साडेपाच पर्यंत रांगाच रांगा दिसत होत्या. काही ठिकाणी मतदान याद्यांतील गोंधळामुळे नावे शोधताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक मतदान केंद्रावर वृद्ध व अपंगांनीही उत्साहात मतदान केले.