Maharashtra Election 2019: ‘आम्हाला गृहीत धरू नका’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:13 AM2019-10-23T01:13:54+5:302019-10-23T06:15:11+5:30
Maharashtra Election 2019: राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा; बहिष्कार घातलेल्या मतदारांचं ठरलंय
- हितेन नाईक
पालघर: ‘आम्हाला आता तुम्ही गृहीत धरू नका’ असा इशाराच जणू मतदानावर बहिष्कार टाकलेल्या डहाणू ते केळवे आणि झंजरोली, मायखोप येथील २३ गावातील मतदारांनी राजकीय पक्षांना दाखवून दिले आहे. निवडणूक काळात नेहमी मतदारांशी संपर्क ठेवणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही यावेळी मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला. मतदारांचा हा पवित्रा सर्वच राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा ठरणार आहे.
वाढवण बंदराच्या विनाशकारी प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणाºया विविधांगी समस्यांनी इथला स्थानिक भूमिपुत्र उद्धवस्त होणार असल्याने हे बंदर उभारणीचे काम रद्द करावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. तरीही हे बंदर जबरदस्तीने लादण्याचे काम छुप्या रीतीने सुरू आहे. तर वाढवण बंदराला संरक्षण कवच ठरलेले डहाणू पर्यावरण प्राधिकरण हटविण्याचा डाव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
केळवे पूर्वेकडील नागरिकांच्या चांगले रस्ते, उड्डाणपूल अशा माफक अपेक्षाही पूर्ण होत नसल्याने गर्भवती, गंभीर रुग्ण वेळीच उपचार मिळत नसल्याने दगावण्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी या सर्व समस्यांवर उपाययोजना आखाव्यात, वाढवण बंदर रद्द करावे या मागण्यांसाठी अर्ज विनंत्या, निवेदने, मोर्चा-आंदोलने करूनही सरकार लक्ष देत नसल्याने २३ गावातील मतदारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारल्याने शिवसेना, भाजपसह अनेक पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
वाढवण येथील धूमकेतू, वासगाव, तिकडे पाडा वाढवणं पोखरण गुंगवाडा बाडा पोखरण, धाकटी डहाणू आदी भागातील एकूण १७ बुथ वर १३ हजार १९३ मतदार होते त्यापैकी अवघ्या ६१ मतदारांनी मतदान केले. तर दुसरीकडे धूमकेतू टीघरे पाडा, वाढवण, बाडा-पोखरण या चार बुथवर शून्य टक्के मतदान झाल्याने मतदान केंद्राध्यक्षांना रिकाम्या पेट्या घेऊन परत जावे लागले. सातपाटीमधील १३ हजार ४९० मतदार असून त्यापैकी ३ हजार ९१० मतदारांनी मतदान केले. वडराई, केळवे, टेम्भी, शिरगाव, मुरबे, उच्छेळी-दांडी येथेही मतदानाचा टक्का घसरल्याने पहावयास मिळाले.
केळवे पूर्व भागातील झंजरोली, मायखोप, केळवे रोड या भागातील झंजरोली बुथवर १०५१ मतदारारापैकी १ हजार ३१ मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला, केळवे रोड येथील चार मतदान बुथवर एकूण २ हजार ४१५ मतदार असून त्यापैकी २ हजार ०९० मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. तर २०१४ च्या निवडणुकीत अवघ्या ५१५ मतानी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांचा पराभव करण्यात मोठा वाटा उचलणाºया मायखोपच्या मतदारांनी सेनेच्या नेत्यांचे ऐकून न घेता उत्स्फूर्तपणे बहिष्कार टाकला.
मतदारांच्या एकजुटीचे बळ
इथल्या २ हजार १३० मतदारां पैकी १ हजार ८९७ मतदारांनी बहिष्कार घालीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना इशारा दिल्याचे दिसून आले. मतदान नाकारून निवडणुकीवर बहिष्कार यशस्वी केल्याने हा शिवसेनेसह इतर पक्षाला इशारा असून आमच्या विकासात्मक गोष्टीकडे प्रथम लक्ष द्या आणि मगच मते मागायला या असा इशारा या मतदारांनी लोकप्रतिनिधींना दिला आहे.