भाड्याच्या लोकांवर काय निवडणूक लढवता? हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:52 PM2019-10-04T23:52:24+5:302019-10-04T23:52:47+5:30
दुसऱ्याच्या पक्षातून उमेदवार पळवून आणून त्यांना उमेदवारी देणा-या शिवसेनेला पक्षात एकही लायक उमेदवार मिळत नाही का?
पालघर : दुसऱ्याच्या पक्षातून उमेदवार पळवून आणून त्यांना उमेदवारी देणा-या शिवसेनेला पक्षात एकही लायक उमेदवार मिळत नाही का? भाड्याच्या लोकांवर निवडणुका काय लढवता, असा थेट सवाल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ.हितेंद्र ठाकूर यांनी पालघरच्या पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर शुक्रवारी, शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर, आ. आनंद ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, जनता दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघांत भाजपमधून पळवून आणलेले श्रीनिवास वनगा, बोईसरमधून आमच्याच बविआमधून पळवून नेलेले विलास तरे, वसईमधून काँग्रेसमधून पळवलेले विजय पाटील तर नालासोपारामधून प्रदीप शर्मा निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये निष्ठावान कार्यकर्ते उरलेच नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांनी फक्त बाहेरच्या उमेदवारांना निवडून देण्याचेच काम करायचे का? त्यांच्यावर खूप अन्याय केला जातोय, असेही आ. ठाकूर यांनी म्हणाले. जर सेनेला लढायचे असेल तर स्वत:च्या हिंमतीवर लढा, उधारीच्या उमेदवाराच्या भरवशावर काय लढता, असे आव्हान त्यांनी दिले.
प्रदीप शर्मा यांनी केलेल्या ११७ एन्काऊंटरदरम्यान त्यांना साधे खरचटलेही नाही. त्यांनी झोपलेल्या माणसांना हातात बेड्या घालून मारले असून या सर्व प्रकरणाची माहिती मी गोळा करायला घेतल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले. त्यांना आरोप करायचे असेल तर त्यांनी मतदार आणि पत्रकारांसमोर एका व्यासपीठावर येऊन आरोप करावेत असे खुले आव्हान आ.क्षीतिज यांनी दिले.
पालघर विधानसभेची जागा काँग्रेसला असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चर्चेअंती हीच जागा आता राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला आल्याने अमित घोडा हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज ७ तारखेला मागे घेईल, असे आ.ठाकूर यांनी सांगितले. जिल्ह्यातील बविआ पक्षाचे वर्चस्व सेना संपवायला निघाली आहे.
का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी स्वत: संपू नये, असे उत्तर दिले. यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या ४ जागा शिवसेनेला देऊन त्यांना पराभूत करून जिल्ह्यात वर्चस्व राखण्याचे काम बविआच्या मदतीने कोणी करीत तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
माझा बळी दिला - अमित घोडा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माझा बळी दिल्याचे प्रतिपादन सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी लढवीत असलेले अमित घोडा यांनी
पत्रकार परिषदेत केले.
माझे वडील कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी जिंकून आलो. ३ वर्षाच्या कालावधीत लोकोपयोगी कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशावेळी पालघर विधानसभेसाठी आपला शब्द पाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवासला उमेदवारी दिल्याचे घोडा यावेळी म्हणाले.
श्रीनिवास यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतले. तू नाराज होऊ नकोस तुला चांगले पद देईन, असे सांगितले. परंतु, हे व्यासपीठावरून सर्वांसमोर सांगितले असते तर बरे झाले असते असेही त्यांनी सांगितले. कारण श्रीनिवासला विधानपरिषदेची जागा देण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले असताना प्रत्यक्षात मात्र मला बाजूला सारून श्रीनिवासला पालघरची उमेदवारी दिल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, पालघर येथे माजी आ. घोडा यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेले आ. ठाकूर नंतर हे बोईसर येथेही गेले. आम्ही व मित्र पक्ष मिळून सहाही विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते शुक्रवारी बोईसरला आले होते.