Maharashtra Election 2019 : पालघर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:38 AM2019-10-04T00:38:45+5:302019-10-04T00:40:37+5:30
पालघर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पालघर : श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पालघर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली असून गुरुवारी आपली आई आणि शेकडो समर्थकांसह त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर माजी पोलीस अधिकारी चकमकफेम प्रदीप शर्मा यांना शिवसेनेने नालासोपाऱ्यातून उमेदवारी दिली असून गुरुवारी त्यांनी देखील आपला अर्ज दाखल केला. डहाणूतून भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे यांनी तर बोईसर येथे विद्यमान आ. विलास तरे आणि भाजपचे बंडखोर संतोष जनाठे यांनीही आपापले अर्ज भरले आहेत.
अर्ज भरायला जाताना वनगा यांनी पालघर येथील हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना वंदन केले आणि हुतात्मा स्तंभ ते पालघर तहसीलदार कार्यालय अशी रॅली काढली. यावेळी श्रीनिवास वनगा यांच्या सोबत त्यांचे कुटुंब तसेच खा. राजेंद्र गावित, संपर्क प्रमुख आ. रविंद्र फाटक, जिल्हाध्यक्ष राजेश शहा, तालुकाध्यक्ष विकास मोरे, जिप सदस्य सचिन पाटील, भाजपचे सुजित पाटील आणि शिवसेना - भाजप महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
२०१४ मध्ये निवडून आलेले भाजप खा. चिंतामण वनगा यांच्या अकस्मात निधनानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पालघर विधानसभेची उमेदवारी दिली होती. गुरुवारी दुपारी आपल्या समर्थकासह पालघर तहसीलदार कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालघर विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा दावा आ. फाटक यांनी केला आहे.
विलास तरे, संतोष जनाठे यांनी भरले अर्ज
बोईसर : बोईसर विधानसभा मतदारसंघासाठी सेना - भाजप युतीचे उमेदवार आणि बोईसर विधानसभेसाठी इच्छुक असलेले परंतु उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे पालघर जिल्हा चिटणीस यांनी अपक्ष म्हणून अशा दोन उमेदवारांनी वाजत -गाजत मोठे शक्ती प्रदर्शन करून एकूण सहा उमेदवारी अर्ज भरले. तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात असून ते शुक्रवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरणार आहेत.
गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास भाजपाचे पालघर जिल्हा चिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपाचे काही तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू युवा वाहिनी, अशा अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर सेना -भाजप युतीचे उमेदवार विलास तरे यांनी सेना, आरपीआयचे, काही भाजप पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या सोबत अर्ज दाखल केला. बोईसर विधानसभेसाठी एकूण २३ जणांनी ४८ अर्ज नेले आहेत.
जगदीश धोडी अनुपस्थित
बोईसर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे पालघर उपजिल्हाप्रमुख आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी बुधवारी रात्री सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु ते आज युतीचे उमेदवार विलास तरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याप्रसंगी अनुपिस्थत राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ते बविआतून अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने निश्चित माहिती मिळाली नाही.
दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून दाखल केले उमेदवारी अर्ज
नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदारसंघासाठी युती आणि बविआच्या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी सकाळी शक्तीप्रदर्शन करून नालासोपारा पश्चिमेकडील वृंदावन गार्डनमधील निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनामुळे जवळपास ३ ते ४ तास वाहतूक कोंडी झाली होती. या मतदारसंघासाठी १५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले असून मंगळवारी एकाने अर्ज भरला.
नालासोपारा मतदारसंघासाठी युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. तर बविआचे हितेंद्र ठाकूर, प्रवीणा ठाकूर यांनी प्रत्येकी एक तर क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी तीन उमेदवारी अर्ज भरले आहेत. याव्यतिरिक्त गुरुवारी विजया दत्ताराम समेळ (अपक्ष), हितेश प्रदीप राऊत (संघर्ष सेना), अमर किसन कवळे (अपक्ष), परेश सुकुरु घाटाळ (अपक्ष), सुशांत मधुकर पवार (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज भरले.
नाराज राजन नाईक यांची समजूत काढण्यात सेना यशस्वी
नालासोपारा मतदार संघातून भाजपच्या वाट्याला जागा उपलब्ध न झाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले राजन नाईक यांनी बंडाचे निशाण खाली घेतले आहे.
आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आपण भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या महायुतीच्या बैठकीत जाहीर केले होते. गुरु वारी शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायलाही नाईक उपस्थित होते.
डहाणूत विद्यमान आ. पास्कल धनारे यांनी भरला अर्ज
डहाणू/बोर्डी : डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे यांनी गुरुवारी दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप-शिवसेनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी त्यांच्यासह होते.
सकाळी त्यांनी डहाणूतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनतर शेकडो कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढून डहाणू - बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरून आगर येथील प्रांत कार्यालयात असलेले निवडणूक कार्यालय गाठले.
रॅली दरम्यान ते डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या बुलेटवर मागे बसून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी
सौरभ कटीयार आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग यांना अर्ज सादर केला.
विक्र मगडमध्ये ‘वंचित’कडून संतोष वाघ यांचा अर्ज
मोखाडा : विक्रमगड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून संतोष वाघ यांना उमेदवारी दिली असून गुरुवार, ३ आॅक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.