पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:39 AM2019-10-05T00:39:49+5:302019-10-05T00:40:16+5:30

पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पालघर, बोईसर व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण झाल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

Maharashtra Election 2019: key contest in Palghar District | पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

Next

पालघर : पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पालघर, बोईसर व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण झाल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी शमवण्यात जर राजकीय नेत्यांना अपयश आले तर निवडणुकीची रंगत वाढणार आहे. डहाणू, नालासोपारा, वसई या मतदारसंघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रचारादरम्यान येथील सहा मतदारसंघातील चित्र हळूहळू स्पष्ट होईल. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८० उमेदवारांनी ११६ अर्ज दाखल केले.

डहाणू मतदारसंघात एकूण १३ उमेदवारांनी १७ अर्ज भरले असले तरी खरी लढत ही भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे व माकपचे विनोद निकोले यांच्यात रंगणार आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. २०१४ च्या निवडणुकीत आ. धनारे यांच्या विरोधात लढणारे माकप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याने धनारे विजयी झाले. परंतु यावेळी धनारे यांच्या विरोधात माकपच्या उमेदवाराला राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, बविआ आणि काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

विक्रमगड मतदारसंघात भाजपने माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या उमेदवारीला भाजप मधून विरोध होत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्यासह अन्य दोन पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरल्याने बंडखोरी टिकून राहिली तर डॉ. सवरा व राष्ट्रवादीचे सुनील भुसारा अशा सरळ होणाºया लढतीचे चित्र बदलणार आहे. सेनेचे जिप सदस्य आणि गटनेते प्रकाश निकम यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याचे कारण देत राजीनामा दिल्याने त्यांच्यासह जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे व श्रमजीवीचे विवेक पंडित यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पालघर विधानसभेसाठी आठ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत ही शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा आणि शिवसेनेतून बंडखोरी करून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणाºया अमित घोडा यांच्यात रंगणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाºया पालघरमधील मतदारांनी अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुमारे ६० हजार मताधिक्य मिळवून दिल्याने शिवसेना हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून पहात होती. मात्र श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपले विजयी उमेदवार अमित घोडा यांना डच्चू देत श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्याने घोडा नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेत उमेदवारी मिळवली. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत आता वाढली आहे. घोडा यांना काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, जनतादल व काही आदिवासी संघटनांचा पाठिंबा आहे.

बोईसर विधानसभेत बविआचे आ. विलास तरे यांनी सेनेत प्रवेश केल्याने त्यांची लढत बविआचे उमेदवार राजेश पाटील यांच्याशी होणार, असे चित्र होते. मात्र, येथे भाजपतून बंडखोरी झाली.

युतीला बंडखोरीचा फटका बसणार?

जिल्ह्यात सेनेला चार जागा सोडून भाजपवर अन्याय करण्यात आल्याचे सांगून संतोष जनाठे यांनी युतीचे उमेदवार विलास तरे यांना अडचणीत आणले आहे. जनाठे यांना बजरंग दल, विहिंप सोबत भाजपमधून छुपा पाठिंबा मिळणार असल्याने युतीला बंडखोरीचा मोठा फटका बसू शकतो.

नालासोपारा हे बविआचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखले जात असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना उमेदवार राजेंद्र गावित यांनी या मतदारसंघात बविआपेक्षा जास्त मते मिळवत बविआला धक्का दिला होता.

या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी चकमकफेम प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरवून बविआपुढे आव्हान उभे केले आहे. या निर्णयानंतर आ. हितेंद्र ठाकूर यांनी आपली पत्नी प्रविणा ठाकूर आणि मुलगा आ. क्षितिज ठाकूर या तिघांचे उमेदवारी अर्ज भरत बविआने वेगळीच खेळी खेळली आहे.

वसई विधानसभेत बविआचे आ. हितेंद्र ठाकूर असून सेनेच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात काँग्रेस बविआला पाठिंबा देणार असल्याचे कळताच एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे उद्योगपती असलेल्या विजय पाटील यांना सेनेत प्रवेश देत उमेदवारी घोषित केली. तब्बल २९ गावे वगळण्याच्या प्रश्नावर पश्चिम पट्ट्यातील ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेला मतदार नाराज असल्याने ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील.

Web Title: Maharashtra Election 2019: key contest in Palghar District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.