महाराष्ट्र निवडणूक २०१९: यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही; बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:12 PM2019-10-22T17:12:42+5:302019-10-22T17:14:06+5:30
विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसाठी वसई, नालासोपारा आणि बोईसर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. सगळ्यांनाच प्रतिक्षा निवडणुकांच्या निकालाची लागली आहे. नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना युतीमध्ये अटीतटीची लढत आहे. तत्पूर्वी वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी या पुढे निवडणूक लढविणार नाही, पण राजकारणातून सन्यास घेणार नाही अशी घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसाठी वसई, नालासोपारा आणि बोईसर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. याठिकाणी शिवसेनेने बविआसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. वसईत स्वत: हितेंद्र ठाकूर निवडणुकीला उभे आहेत तर नालासोपारा येथे शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्यासमोर कडवी झुंज देत आहेत.
यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे मुद्दे नसतील तर दहशतीचे आरोप करतात, वसई-विरारमध्ये सर्व लोकं एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. त्यात असे कोणीही उपरे येतात आणि दहशतीचा आरोप करतात. अतिशय गंभीर आरोप केले गेले. जाणीवपूर्वक मी निवडणुकीच्या मतदानानंतर मी पुढे निवडणूक लढणार नाही हे जाहीर केलं. कारण परत कोणी भावूक वैगेरे आरोप केले असते. मी राजकारणात राहणार, कार्यकर्त्यांना पुढे आणणार, कामं करुन बाहेरुन कोण आलेले आरोप करतात असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच प्रदीप शर्मा यांनी पैसे वाटले, पोलीस यंत्रणा हाती घेतली. गुंड कार्यकर्ते आणले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या गाडीला घेराव घातला. काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना सोडलं. मी याबाबत लेखी तक्रार दिली आहे. आयजी यांनी विशेष लक्ष दिल्याने प्रदीप शर्माच्या गुंडांना हुल्लडबाजी करता आली नाही. आम्ही विकासावर बोलतोय तुम्ही विकासावर बोला. पुढील ५ वर्षात जे उरलेली कामे आहे ती सर्व पूर्ण करणार आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांना पूर्ण सहकार्य करणार आहे. आमच्या तिन्हीही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा म्हणून निर्णय घेतला. मी निवडून येणार ही खात्री आहे. पुढच्यावेळीही या जागा कायम राहणार हा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.