Maharashtra Election 2019: वसईत शहरी, ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:24 AM2019-10-22T01:24:03+5:302019-10-22T01:24:24+5:30
Maharashtra Election 2019: मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला.
वसई : मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला. दोन-दोन तासांनी तसेच दुपारनंतर वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदार बाहेर पडू लागल्याने मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढत गेली.
येथे प्रामुख्याने बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेचे विजय पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.
सकाळच्या वेळी चुळणे भागात ९.३० च्या सुमारास साधारण तासभर तरी वीज खंडित होण्याचा प्रकार घडला होता, मात्र नंतरच्या काळात कुठेही मतदानकेंद्रावर तांत्रिक अथवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान किंवा तुरळक मारामारी असे प्रकार वसई आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले नसून सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे वसई आणि माणिकपूर पोलीस निरीक्षक पुकळे आणि राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ५८ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती वसई विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किरण सुरवसे यांनी लोकमतला दिली. सकाळी पहिल्या टप्प्यात दोन तासात ८.३३ टक्के मतदान झाले. तर दुपारी १ वाजेपर्यंत हाच आकडा ३६.५१ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर टक्केवारी वाढत गेली आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी सांगितले.