Maharashtra Election 2019: आदिवासींना दोन किलो तूरडाळ, एक लीटर खाद्यतेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 01:05 AM2019-10-18T01:05:54+5:302019-10-18T01:06:30+5:30
Maharashtra Election 2019: फडणवीस यांचे आश्वासन : कुपोषण समूळ नष्ट करणारी योजना राज्यभर राबवणार
मोखाडा : आदिवासी भागातील कुपोषणाला अमृत आहार योजनेमुळे आळा बसला आहे. मात्र, कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी कुटुंबांना दोन किलो तूरडाळ व एक लीटर रिफाइंड खाद्यतेल मोफत देण्याची योजना या भागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. या योजनेसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या कार्याबद्दल फडणवीस यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाने पाच वर्षांत विशेष प्रयत्न केले आहेत, असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, कुपोषण कमी झाले, वनपट्टेधारकांना जमिनी मिळाल्या आहेत, घराघरांत गॅस आणि वीज पोहोचवली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळाली आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आहेत. आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण मिळू लागले आहे. खेडोपाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते तयार केले आहेत, तर आता स्थानिक ठिकाणीच शेतीतून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या भागात छोटेछोटे बंधारे बांधून सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विक्रमगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी जव्हार येथील राजीव गांधी स्टेडिअमवर जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला आहे. गेल्या १५ वर्षांत तुम्ही काय विकास केला तो दाखवा, नाहीतर आम्ही पाच वर्षांत किती विकास केला तो दाखवतो, असे आव्हान त्यांनी दिले. आदिवासी विकास खात्यातील पैसे आघाडी सरकारच्या काळात पूर्ण खर्च केले जात नव्हते. मात्र, आदिवासी विकासमंत्री सवरा यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण निधी खर्च करून आदिवासींचा विकास साधल्याचे फडणवीस म्हणाले. जव्हार नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सवाला मी आलो होतो, त्यावेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, तर पुढील तीन महिन्यांत उर्वरित सर्व कामे मार्गी लावणार असे फडणवीस म्हणाले.
प्रत्येक वर्षी जव्हारला एक चक्कर...
पाच वर्षांत या भागात तीन वेळा येणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. या भागाचा आणि जव्हारचा पर्यटनातून विकास करण्यासाठी मी प्रत्येक वर्षी येथे येणारच, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश...
माजी पर्यटन विकास राज्यमंत्री आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या मनीषा निमकर यांनी यावेळी भाजपतील प्रवेश केला, तर विक्रमगडचे काँग्रेसचे पदाधिकारी शिवराम गरिंदले यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेस पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. राजेंद्र गावित, गुजरातमधील खा. के.सी. पटेल, आमदार कनुभाई देसाई, शंकरभाई वारली, डहाणू विधानसभा संयोजक भरत राजपूत, सहसंयोजक लक्ष्मण खरपडे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, डहाणूभाजपाध्यक्ष विलास पाटील, भरत शहा, लुईस काकड, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष सुरेश शिंदा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, विनीत मुकणे, हरिश्चंद्र भोये, सुरेखा थेतले, प्रकाश निकम यासह भाजप, सेना, आरपीआय, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.