पालघरची निवडणूक तिरंगी होणार, बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या रिंगणात, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:30 PM2024-04-09T15:30:46+5:302024-04-09T15:32:14+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बविआचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरारच्या विवा कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेऊन पालघर लोकसभा निवडणूक लढवणार असून येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार घोषित करणार असल्याचे वक्तव्य करून पालघर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बविआचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरारच्या विवा कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेऊन पालघर लोकसभा निवडणूक लढवणार असून येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार घोषित करणार असल्याचे वक्तव्य करून पालघर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बविआ रिंगणात उभी राहणार असल्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात, भाजपाच्या गटात खळबळ माजली आहे. सर्वच पक्षात माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी माझ्या बविआ पक्षाला ही सीट सोडावी अशी मागणी पुन्हा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
८ ते १० उमेदवार इच्छूक असून लवकरच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एका उमेदवाराचे नाव घोषित करणार असल्याचे ठाकुरांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात तीन माझ्या पक्षाचे आमदार असल्याने मनपा, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती या बविआकडे असल्याने आमची मते फिक्स आहेत. मतांची आकडेवारी जुळून आलेली असून या निवडणुकीत बविआचा उमेदवार निवडून येईल असेही ठाकुरांनी सांगितले. तसेच उमेदवार निवडून आल्यावर जो पालघर जिल्हा आणि वसईच्या विकासासाठी मदत करणार त्यांना पाठींबा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीत आम्ही निवडून येणार असून बाकीचे दोन व तीन नंबरसाठी लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.