Vidhan Sabha 2019: बोईसरमध्ये शिवसेनेला भाजपचा कडवा विरोध, काम न करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:32 AM2019-10-01T00:32:19+5:302019-10-01T00:33:05+5:30
बहुजन विकास आघाडीला धक्का देत त्यांचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना पक्षात घेणाऱ्या शिवसेनेसमोर मित्र पक्ष असलेल्या भाजपचेच आव्हान उभे ठाकले आहे.
- पंकज राऊत
बोईसर - बहुजन विकास आघाडीला धक्का देत त्यांचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना पक्षात घेणाऱ्या शिवसेनेसमोर मित्र पक्ष असलेल्या भाजपचेच आव्हान उभे ठाकले आहे. या मतदारसंघावर दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेला ही जागा सोडण्यास ठाम विरोध केला आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयापर्यंत हा विषय त्यांनी पोहोचवला असून त्यानंतरही ही जागा शिवसेनेला सोडली, तर त्या उमेदवाराचे काम न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघापाठोपाठ बोईसर विधानसभेची जागा युतीत शिवसेनेला दिल्यास जिल्ह्यात काँग्रेसला मुक्त करता- करता भाजपलाही मुक्त करु नका, असा इशारा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदेश नेत्यांना दिला आहे. भाजपच्या प्रदेश चिटणीस अर्चना वाणी यांच्यासह बोईसर विधानसभा मंडळाचे महावीर जैन, प्रमोद आरेकर, राधेश्याम चौधरी आणि सुनील केणी या चार अध्यक्ष आणि बोईसर विधानसभा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र देत या मतदारसंघावर दावा केला. तसेच संघटनमंत्री विजय पुराणिक आणि मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.
भाजपची स्थिती कशी?
२०१४ मध्ये बोईसर विधानसभा निवडणुकीत भाजपचे जगदीश जोडी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना ३०,२८८ (१७.६५ टक्के) इतकी मते मिळाली. ते तिसºया क्र मांकावर होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांना ५१,६७७ (३०.१७ टक्के) इतकी दुसºया क्र मांकाची मते मिळाली होती. याच निवडणुकीमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुनील धानवा अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांना ५,७०२ (३.३३ टक्के) अशी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या निवडणुकीत बविआचे विलास तरे ६५,५५० मते मिळवून १२ हजार ८७३ च्या मताधिक्याने निवडून आले.
सध्याचे चित्र काय?
जिल्ह्यातील डहाणू व विक्र मगड हे दोन मतदारसंघ भाजपला आणि उरलेले चार मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २००९ व २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनी बोईसरमध्ये विजय मिळविला होता. तर या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती.
भाजपचे इच्छूक उमेदवार संतोष जनाठे काही वर्षांपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. भाजपाला बोईसरची जागा मिळाली, नाही तर अन्याय होईल.
- महावीर जैन, अध्यक्ष,
बोईसर विधानसभा मंडळ.
भाजपची बोईसरमधील संघटनात्मक ताकद वाढली असून आम्हाला ही जागा मिळावी, हा आमचा आग्रह आहे. आमचा पक्ष संस्कारावर चालणारा आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळू. आम्हाला ही जागा मिळेल, अशी आशा आहे.
- अर्चना वाणी, भाजप प्रदेश चिटणीस.