जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे, नालासोपाऱ्यात भाजप बंडाच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:59 PM2019-10-01T23:59:20+5:302019-10-02T00:00:31+5:30
नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले
नालासोपारा : विधानसभा निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे युतीची घोषणा झाली आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे येथील भाजपच्या राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सूत्रांकडून कळते. राजन नाईक हे निवडणुकीला उभे राहिले तर सेनेच्या प्रदीप शर्मा यांना ही निवडणूक खडतर जाणार असून बविआला विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राजन नाईक यांना ६० हजार तर सेनेच्या शिरीष चव्हाण यांना ४० हजार मते मिळाली होती. पण युती न झाल्याने बविआचे क्षीतिज ठाकूर निवडून येत ते आमदार झाले. सेनेचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. तर दुसरीकडे या निवडणुकीत राजन नाईक यांना उमेदवारी मिळून त्यांना निवडून आणण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेत मतदारांशी जनसंपर्क वाढवला होता.
भाजप पदाधिकारी मनोज बारोट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नाईक यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या ५ वर्षात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत केली होती.
मतदारांचा कौल आजमावतोय
मला उमेदवारी मिळावी अशी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मतदारांशी संपर्क सुरू असून मतदारांचा कौल घेत आहे. सेनेने स्थानिकांना उमेदवारी देण्याऐवजी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. यापेक्षा जो उमेदवार सहा वर्षे पक्षाचा सदस्य आहे त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. - राजन नाईक (भाजपचे नाराज उमेदवार)
प्रदीप शर्मा ३ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज....
सेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा हे ३ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे.