Vidhan sabha 2019 : बोईसरमध्ये महायुतीचा उमेदवार अडचणीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:17 AM2019-10-03T00:17:32+5:302019-10-03T00:17:56+5:30

बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र...

Maharashtra Vidhan sabha 2019: Mahayuti candidate in Boiseer in trouble? | Vidhan sabha 2019 : बोईसरमध्ये महायुतीचा उमेदवार अडचणीत?

Vidhan sabha 2019 : बोईसरमध्ये महायुतीचा उमेदवार अडचणीत?

Next

- हितेन नाईक/आरिफ पटेल
पालघर/मनोर : बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र, पक्षाच्या विरोधात हा लढा नसून पाच वर्षांच्या निष्क्रियतेच्या विरोधातला माझा हा लढा असल्याचे सांगितल्याने युतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यात एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी भाजपची मोठी राजकीय ताकद असताना भाजपच्या वरिष्ठांनी सहा विधानसभांपैकी पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई अशा चार जागा शिवसेनेला बहाल केल्याने उपस्थित भाजप व सहकारी संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाचा हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करतानाच आपला राग हा पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नसल्याचेही जनाठे यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षात निष्क्रिय आमदार ठरलेल्या आ. विलास तरे यांना बविआमधून उमेदवारी मिळत नसल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. अशा निष्क्रिय आमदाराला उमेदवारी देण्यात आल्याने संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. बुधवारी मनोर येथे आयोजित बैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पालघर नगरपरिषदेच्या भाजपच्या आरोग्य सभापती लक्ष्मीदेवी हजारी, तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, शहर अध्यक्ष तेज हजारी, पंचायत समिती सदस्य रंजना संखे यांच्यासह बोईसर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. या दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी एकता मित्र मंडळ, कातकरी महासंघ आदींनी आपला पाठिंबा जनाठेंना दर्शविला.

जिल्हा शिवसेनेला बहाल केल्याचे आणि बोईसर विधानसभा भाजपऐवजी सेनेला देण्याच्या निर्णयाचे मोठे पडसाद मनोरच्या बैठकीत उमटले. आमचा लढा हा निष्क्रियतेच्या विरोधातला असून आतापर्यंत ज्या विचारासाठी लढलो त्या विचारांना वाचविण्यासाठी आपण ही लढाई लढत असल्याचे जनाठे यांनी पत्रकारांना सांगितले. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून १५ वर्षे संघटक प्रचारक, पाच वर्षे भाजप पक्षाच्या बळकटीकरणला हातभार लावला. आम्ही बंडखोरी केली नसून पक्षाच्या विरोधातही काम करणार नाही, तर जिंकून आल्यावर पक्षालाच पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.

निष्ठावंतांच्या नाराजीतून बंडखोरी?
भाजप - शिवसेना पक्षात झालेल्या पक्षांतरामुळे निष्ठावानांच्या नाराजीतून बंडखोरीच्या घटना घडत आहेत. जनाठे नंतर विक्रमगड विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याविरोधात थोड्या मताने पराभूत झालेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनीही जिल्हा परिषद गटनेता आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सेनेचे जगदीश धोडी, विद्यमान आमदार अमित घोडा आदींसह अनेक पदाधिकारी नाराज असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी मतदानापूर्वी काही झटके शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Mahayuti candidate in Boiseer in trouble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.