Vidhan Sabha 2019: 'दहशतीचा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो!'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:29 AM2019-09-26T03:29:36+5:302019-09-26T03:30:18+5:30
क्षितिज ठाकूर यांची नाव न घेता प्रदीप शर्मा यांना टोला
वसई : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की वसईतील दहशतीचा मुद्दा उफाळून येतो; इतरवेळी सारेकाही आलबेल असते. दहशतीचा हा ‘पोपट’ केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो, असा टोला आमदार क्षितिज ठाकूर यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नाव न घेता लगावला.
बहुजन विकास आघाडीतर्फे विरार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ठाकूर यांनी ‘साहेब’ कुठे राहतात, असा सवाल केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी अंधेरी, मुंबई असे म्हटल्यावर आ. ठाकूर यांनी त्या ठिकाणी किती लेडीज बार आहेत, असा प्रतिप्रश्न केला. आमची दहशत आहे असे म्हणता ना, तर होय आमची दहशत आहेच. म्हणूनच आम्ही येथे लेडीज बार सुरू करू दिले नाहीत, येथे आजही एकटी महिला रिक्षाने मध्यरात्रीनंतरही एकट्याने घरी सुरक्षितपणे जाऊ शकते, असेही ठाकूर यांनी ठणकावले.
‘आम्ही भेदभाव केला नाही’
धर्म, वंश, जात, लिंग, भाषा आणि प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता बविआने सर्वांना एका परिवारात आणले. येथील जनतेचा बविआवर विश्वास असून जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण करून पिटाळले जात होते, गुजरात्यांवर हल्ले होत होते तेव्हा हे एन्काउंटर स्पेशालिस्ट कुठे होते? आजही बविआकडे असलेली कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, ताकद, विकासकामे आणि जनतेचा बविआवर असलेला प्रचंड विश्वास यामुळे सैरभैर झालेली मंडळी नसलेल्या दहशतीचा कळीचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचेही आमदार ठाकूर यांनी म्हटले.