उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:14 AM2019-10-02T00:14:19+5:302019-10-02T00:16:57+5:30

विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

Maharashtra Vidhan sabha 2019: Rebellion in BJP after candidate list was announced? | उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

Next

- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि दोन आमदार असूनही आधी लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. तसेच आता विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना बविआ किंवा आघाडीपेक्षा आपल्याच बंडखोरांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे आधी राम नाईक यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर १९९६ पासून पालघर लोकसभेवर चिंतामण वनगांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी देत भाजपला अडचणीत आणले. प्रत्युत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत पालघरची जागा जिंकून दाखवली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकीटावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

डहाणू विधानसभेतून पास्कल धनारे, विक्रमगडमधून विष्णू सवरा निवडून आले. पालघर विधानसभेतून निवडून आलेले अमित घोडा ही एकमेव जागा शिवसेनेकडे असतानाही भाजप श्रेष्ठींनी आधी लोकसभेची जागा शिवसेनेला दिली. तसेच जागावाटपात पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या चार जागा शिवसेनेला सोडल्याने स्थानिक भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी बोईसरमध्ये आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे केला. परंतु, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी बुधवारी मनोर येथे तातडीची बैठक बोलावली असून प्रसंगी स्वबळावर तयारी चालविल्याचे कळते. डहाणू मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा आ. पास्कल धनारे यांना संधी दिली आहे. त्यांची लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांच्याशी होणार आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआसह कष्टकरी संघटनेचा पाठिंबा मिळणार आहे. येथे मनसे, वंचित आघाडी आदी उमेदवार असले तरी खरी लढत भाजप आणि माकप आघाडीत होणार आहे.

विक्रमगड विधानसभा निर्मितीपासून भाजप-शिवसेना एकमेकांविरूद्ध लढत होते. तेथे युतीचा वरचष्मा आहे. सध्या माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते निवडणूक लढविणार नसल्याने त्यांचा मुलगा डॉ. हेमंत सवरा यांच्यासह अनेक इच्छुक होते. भाजपने डॉ. सवरा यांना संधी दिली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांना उमेदवारी दिली असून महाआघाडीतून काँग्रेस, बविआ व माकप यांची साथ लाभल्याने येथे कडवी लढत रंगेल. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटना आणि २०१४ मधील सेनेचे उमेदवार व जि.प. सदस्य प्रकाश निकम आणि विष्णू सवरा यांच्यातून विस्तवही जात नसल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

पालघर विधानसभेतील विद्यमान आमदार अमित घोडा यांना संधी नाकारत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यांना ए-बी फॉर्म दिले आहेत. मतदारसंघातील तोकडा जनसंपर्क, निष्क्रियतेचा अमित यांना बसल्याचे बोलले जाते. वाढवण बंदराबाबतची सेनेची अस्पष्ट भूमिका, डहाणू प्राधिकरण रद्द करण्याच्या हालचाली याबाबतची मतदारांची नाराजी शिवसेनेला भोवू शकते. येथे वंचित आघाडी, मनसेही निवडणूक लढवत असली, तरी मुख्य लढत सेना विरु द्ध बविआ अशीच रंगणार आहे.

बहुजन विकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष
नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बविआचे शिट्टी चिन्ह गोठवून त्यांना अडचणीत आणले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी या मतदारसंघातून बविआच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळावत बविआला धक्का दिला होता. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तेथे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. मात्र हितेंद्र ठाकूर वसईऐवजी नालासोपाºयातून उतरण्याची तयारी करत आहेत.

वसई मतदारसंघातून सोमवारी हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी प्रविणा ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर या तिघांनीही अर्ज भरले. त्यातील दोघांचे अर्ज डमी असले, तरी अंतिम उमेदवार कोण हे सांगण्यास बविआचे नेते तयार नाहीत. वसईत काँग्रेस बविआला पाठिंबा देणार असल्याचे कळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती असलेल्या काँग्रेसचे विजय पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत त्यांची उमेदवारी घोषित केली.

खिस्ती समाजाचे प्राबल्य असलेला येथील मतदार २९ गावे वगळण्याच्या प्रश्नावर नाराज असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘नोटा’ला मतदान केले. विजय पाटील यांच्या पत्नी ख्रिश्चन समाजातील असल्यानेही त्यांना संधी दिली गेली. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून २९ गावे वगळण्याबाबत ठोस आश्वासने देत येथील मतदार शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भाजपची खेळी? : युतीत शिवसेनेने चार मतदारसंघ पदरात पाडून घेतले असले, तरी त्यातील तीन ठिकाणी त्यांना बविआशी झुंजावे लागेल आणइ एका मतदारसंघात बंडाळीचा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे. भाजपने मात्र विक्रमगड, डहाणू हे आपले सुरक्षित मतदारसंघ शाबूत ठेवले आहेत. त्यामुळे जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाले असले, तरी सनेला झुंजवण्याची भाजपची खेळी तर नाही ना, अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Rebellion in BJP after candidate list was announced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.