महाविकास आघाडी वि. भाजप पालघरमध्ये रंगणार सामना; जि.प.च्या रिक्त जागांचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:52 AM2021-03-24T02:52:57+5:302021-03-24T02:53:31+5:30
घडामोडींकडे साऱ्यांचे लक्ष, सध्या राज्य पातळीवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून एकही संधी सोडला जात नसल्याने या निवडणुकीत भाजपच्या चारही जागा जिंकून जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
पालघर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १५ जागांचे आरक्षण नव्याने घोषित झाले आहे. या सर्व जागांसाठी भाजप स्वबळावर लढणार असून, ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, राज्यपातळीवर भाजप आणि महाविकास आघाडीमधील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे जिल्ह्यातील या निवडणुका अटीतटीने लढल्या जाणार हे जवळपास नक्की झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १५ जागांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण ७ गटांसाठी तलासरी तालुक्यातील उधवा, डहाणू तालुक्यातील सरावली वनई, विक्रमगड तालुक्यातील आलोंडे, मोखाडा तालुक्यातील आसे, वाडा तालुक्यातील मोज, मांडा असे आरक्षण जाहीर झाले. तर अन्य ८ जागांसाठी सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण डहाणू तालुक्यातील कासा, बोर्डी, मोखाडा तालुक्यातील पोशेरा, वाडा तालुक्यातील गारगाव, पालसई, आबिटघर तर पालघर तालुक्यातील सावरे-एम्बूर आणि नंडोरे-देवखोप जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ सदस्यांपैकी शिवसेनेकडे १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे बलाबल असून महाआघाडीची सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने १५ रिक्त झालेल्या जागांपैकी राष्ट्रवादी ७, भाजप ४, शिवसेना ३ व १ सीपीएमच्या सदस्यांना फटका बसला होता. या १५ जागांसाठी होणारी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ अशा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्हे असून भाजपने पंधराही जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या राज्य पातळीवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून एकही संधी सोडला जात नसल्याने या निवडणुकीत भाजपच्या चारही जागा जिंकून जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
सांबरे, ठाकरे, चुरी यांना मिळाला दिलासा
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे, समाजकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, कृषी सभापती सुशील चुरी या तीनही सदस्यांच्या मतदारसंघात सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या १५ जागांमधील आरक्षण जाहीर झाल्याचा फटका फक्त वाडा तालुक्यातील आबिटघर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे आणि पालसई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील या दोघांना बसत असून त्यांच्या गटात सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे, समाजकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, कृषी सभापती सुशील चुरी या तीनही सदस्यांच्या मतदारसंघात सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या १५ जागांमधील आरक्षण जाहीर झाल्याचा फटका फक्त वाडा तालुक्यातील आबिटघर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे आणि पालसई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील या दोघांना बसत असून त्यांच्या गटात सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे.