पालघर-तलासरीत महिलाराज; सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, ग्रामपंचायत सत्तेतील वाटा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:02 AM2021-01-29T01:02:04+5:302021-01-29T01:02:23+5:30

तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ करिता आरक्षण गुरुवारी दुपारी तलासरी पंचायत समितीच्या हॉलमध्ये जाहीर करण्यात आले

Mahilaraj in Palghar-Talasari; Reservation of Sarpanch post announced, Gram Panchayat's share in power will increase | पालघर-तलासरीत महिलाराज; सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, ग्रामपंचायत सत्तेतील वाटा वाढणार

पालघर-तलासरीत महिलाराज; सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, ग्रामपंचायत सत्तेतील वाटा वाढणार

Next

पालघर/तलासरी : जिल्ह्यातील पालघर आणि तलासरी तालुक्यांतील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ सालाकरिता सरपंचपदा-साठीच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. दोन्ही तालुक्यांतील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालघर तालुक्यासाठीचे आरक्षण पालघर तहसीलदार कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये ४६ पैकी २३ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, तर उर्वरित सर्व ठिकाणी सर्वसाधारण सरपंचांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. 

तालुक्यातील माहीम, दांडा, खटाळे, मुरबे, धनसार, मथाणे, टेंभी खोडावे, या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात महिलांचे सरपंचपदी आरक्षण जाहीर करण्यात आले, तर खारेकुरण, खैरेपाडा, दापोली, नांदगाव तर्फ तारापूर, एडवण, वेढी मंजुर्ली, कोलवडे या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सरपंचाच्या जागेसाठी सर्वसाधारण सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. शिल्टे, जलसार, विराथन बुद्रुक, विलंगी, पाम, नगावे, डोंगरे, वाकसई, कांद्रेभुरे, माकुणसार, उसरणी, टेभी, सातपाटी, नवापूर, खार्डी, पंचाळी,भादवे मधुकर नगर या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेत महिलांसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले, तर केळवा, कोळगाव, उमरोळी, मोरेकुरण, वीराथन खुर्द, दातिवरे, कुंभवली, आलेवाडी, शिरगाव, कोरे, सालवड, आगरवाडी, सरावली, मांडे, टिघरे आंबोडे, मायखूप या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले, तर चटाळे ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी अनुसूचित जातीच्या महिला सरपंचाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.  पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती २०१५ ते २०२० साठी अ, ज, महिला करिता ४३ ग्रामपंचायती राखीव होत्या. त्या ग्रामपंचायती २०२० ते २०२५ करिता सर्वसाधारणकरिता राखीव करण्यात आलेल्या आहेत, तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत २०१५ ते २०२० करिता सर्वसाधारण ४२ ग्रामपंचायती राखीव होत्या. त्या ग्रामपंचायती २०२० ते २०२५ करता महिलांकरिता राखीव करण्यात आलेल्या आहेत.

तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ करिता आरक्षण गुरुवारी दुपारी तलासरी पंचायत समितीच्या हॉलमध्ये जाहीर करण्यात आले. या वेळी तहसीलदार स्वाती घोंगडे, नायब तहसीलदार सोमनाथ लोहकरे, पंचायत समिती सभापती नंदकुमार हडळ, उपसभापती राजेश खरपडे, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच उपस्थित होते. या आरक्षण सोडतीत सूत्रकार, झरी, कोदाड, उधवा, वसा, कवाडा, संभा, करजगाव, डोंगारी, कोचाई, बोरमाळ या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले, तर वेवजी, सावरोली, अनवीर, उपलाट, कुर्झे, झाई बोरीगाव, वडवली सवणे, घिमनिया, आमगाव आच्छाड, वरवाडा या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 

यापैकी कोचाई, बोरमाळ या ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. स्मिता विजय (अंधेरी, वय ७ वर्षे) या मुलीने चिठ्ठी काढली. त्यात सरपंचपद महिलांसाठी राखीव निघाले. कोचाई बोरमाळचे सरपंचपद गतवेळीसुद्धा चिठ्ठीने काढण्यात आले होते. त्यामुळे दहा वर्षांपासून कोचाई बोरमाळचे सरपंचपद महिलांकडे आरक्षणाने जात असल्याने व आताही आरक्षण चिठ्ठीने महिलांकडे गेल्याने कोचाई बोरमाळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Mahilaraj in Palghar-Talasari; Reservation of Sarpanch post announced, Gram Panchayat's share in power will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.