विक्रमगडमध्ये माळरानाला लागली आग; महावितरणचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:40 AM2020-12-02T00:40:22+5:302020-12-02T00:40:36+5:30
आंबा, काजूची ५० फळझाडे जळून खाक
विक्रमगड : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे माळरान शेतीचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील शेतकरी गजानन देऊ पाटील यांच्या माळरान शेतीतील वैरणावर महावितरण वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली आणि मोठ्या प्रमाणावर आग लागली.
गजानन पाटील यांनी त्यांच्या माळरान शेतीवर लागवड केलेली आंबा/ काजूची ५० फळझाडे जळून खाक झाली आहेत. या शेतीमधून महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन (स्पार्किंग) त्याची ठिणगी माळरान शेतीतील सुक्या वैरणीवर पडल्यामुळे आग लागली. या आगीत पाच एकर माळावरील वैरण जळून खाक झाली व लागवड केलेले आंबे व काजू यांची ५० झाडेदेखील जळून खाक झाली आहेत. त्यामुळे गजानन पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.
२०१६ सालीही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अशीच आग लागल्याने चार दुधाळ म्हैशींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र पंचनामा करूनही महावितरणकडून कुठलीही नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप विनायक पाटील यांनी केला आहे. २०१८ व २०१९ सालीही पुन्हा आग लागली होती. तेव्हादेखील नुकसान झाले होते, याबाबत महावितरणकडे लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नव्हती. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे गजानन पाटील यांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी घडतात आगीच्या घटना
दरवर्षी महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, मात्र महावितरणकडे तक्रार करूनही महावितरण दखल घेत नाही. त्यामुळे स्पार्किंगमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढतच आहे.