पालघरच्या जंगलातील वणवे मानवनिर्मित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:44 PM2021-03-12T23:44:07+5:302021-03-12T23:44:37+5:30
पर्यावरणरक्षकांकडून कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने या मागच्या षड् यंत्राचा शोध वनविभाग पोलिसांनी लावून वनपरिक्षेत्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी पर्यावरणरक्षकांकडून केली जात आहे. वनपरिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी, आदी अनेक कारणांसाठी जंगलात वणवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभली असून अनेक दुर्मीळ जातीचे, वनौषधीचे वृक्ष असून जवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकत्याच लागलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोर, विक्रमगड, सफाळे तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, कुहे, चिंबीपाडा, दिघाशी, कांबा आदी भागांतील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात असून या मागच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रो. भूषण भोईर यांनी केली आहे.
पालघर, ठाणे जिल्ह्यांच्या अनेक वनक्षेत्रांत बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी-पक्ष्यांचा सहवास असून या आगीमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट होणार आहेत. मागच्याच आठवड्यात ९ मार्चला पालघरजवळील चहाडे, लालठाणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता.
डोंगरावर अनेक भागांत लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जात आहे. यासंदर्भात वनविभाग गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून त्यांची गस्ती पथके याआगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.