घरकाम करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र अखेर सापडले
By Admin | Published: January 14, 2017 06:10 AM2017-01-14T06:10:22+5:302017-01-14T06:10:22+5:30
एका घरकाम करणाऱ्या गरीब महिलेचे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळवून तुळींज पोलिसांनी त्या महिलेला परत केले. याप्रकरणी
वसई : एका घरकाम करणाऱ्या गरीब महिलेचे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळवून तुळींज पोलिसांनी त्या महिलेला परत केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीलाही अटक केली.
तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ७ डिसेंबर २०१६ ला दुपारी १ च्या दरम्यान घरकाम करण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रमिला प्रकाश सुर्वे या गरीब महिलेला दोन आरोपीनीं शेठला सहा मुलीनंतर मुलगा झाला आहे व गरीब लोकांना पैसे वाटत असल्याचे आमिष दाखवून १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली होती.
पीडित महिलेने तुळींज पोलीस स्टेशनला फसवणूक झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याफसवणूक प्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस सहायक उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, मनोज सकपाळ, लक्ष्मण तलवारे आणि सुनील आव्हाड यांच्या टीमने आरोपी साहिल सलीम खान (३५) याला पकडले. आरोपीकडून प्रमिला सुर्वे यांचे मंगळसूत्र जप्त केले. पीडित महिला अत्यंत गरीब असल्यामुळे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांकडून परत मिळवण्यासाठी लागणारा आदेश वसई न्यायालयातून अॅड. केतन बारोट यांनी विनामूल्य आणून दिला. (प्रतिनिधी)