वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:05 AM2020-02-03T01:05:09+5:302020-02-03T01:05:31+5:30

आंब्याला उशिरा मोहोर

Mango begins to bloom in December | वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

googlenewsNext

- राहुल वाडेकर

विक्रमगड : तालुक्यात या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याचा परिणाम
आंबा फळ पिकावर होण्याची शक्यता असून आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन लांबण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा वारंवार बदल याचा परिणाम आंब्यासारख्या हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते, मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. खरे तर नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला व डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होत असते, मात्र थंडीचा मोसम पाहिजे तसा नसल्याने आंब्याला मोहोर येण्याचा हंगाम पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आंबा पिकावर होऊन आंब्याचे पीक ३० ते ३५ दिवस उशिराने येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बागायती शेतकरी आंबा पीकघेतात.

विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते. विक्रमगड तालुक्यात आंबा बागायदार झडपोली, माण, ओंदे, आलोंडे, केव, कुरंजे आदी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेत असून चांगला नफा मिळवत आहेत. परंतु गेल्या दोन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातून जात असतो, मात्र या वर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावली. त्यातच नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते, मात्र या वर्षी पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची शक्यता असून याचा परिणाम आंबा हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या वर्षी परतीचा पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत हजेरी लावली तसेच पाहिजे तेवढी थंडी अद्यापपर्यंत नसल्याने याचा परिणाम आंबा मोहर उशिराने येऊन आंबाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
-विजय सांबरे, आंबा उत्पादक शेतकरी, ओंदे

Web Title: Mango begins to bloom in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.