उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम यंदा मे अखेरीस? खराब हवामानाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:26 AM2018-05-07T06:26:55+5:302018-05-07T06:26:55+5:30
बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.
- अनिरु द्ध पाटील
बोर्डी : बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.
डहाणू तालुक्यात ६१७.३२ हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. या मध्ये समुद्रकिनाऱ्यालगतचे आणि डोंगरी भागातील बागायती असे दोन प्रकार पाहावयास मिळतात. एकाच भौगोलिक क्षेत्रात माती आणि हवेतील क्षारता या मुळे चवीत थोडा फार फरक असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. रायवळ, राजापुरी, तोतापूरी अशा अन्य जातींसह पिकलेल्या आंब्याच्या विक्र ीकरिता केशर आणि हापूसची लागवड दिसून येते. त्या पैकी बोर्डी परिसरातील काही प्रगतीशील शेतकºयांनी रत्नागिरी येथून तीन ते चार वर्षांची हापूस आंब्याची कलमे आणून त्याची लागवड बागायतीत केली आहे. व्यापारी उद्दिष्टाने लागवड केलेल्या हापूस आंब्याची निर्यात मलेशियासह अन्य देशात केली जाते. मात्र आजही हा व्यवहार एजंट मार्फत होत असल्याने उत्पादकांना आर्थिक झळ सोसावीच लागते.
दरम्यान डिसेंबर महिन्यात झालेले ओखी वादळ आणि त्यानंतरच्या काळात ढगाळ वातावरणामुळे पालघर जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन या वर्षी १० ते १५ टक्केच शिल्लक आहे. फळांचा आकार लहान असून रंग अपेक्षेप्रमाणे नाही. त्या मध्ये बरीचशी फळं डागाळलेली आहेत. विशेषत: ही फळं पिकण्याचा हंगाम मे अखेरीस असेल. त्यामुळे पावसाच्या संपर्कात येऊन नासधूस होणार असल्याची खंत बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
करंड्या, बॉक्स यांनाही फटका
बोर्डी परिसरात आंब्याची निर्यात करण्यासाठी बांबूपासून बनविलेल्या टोपल्या (करंडे) आणि हल्ली पुठ्याचे बॉक्स यांचा वापर केला जातो. त्या मध्ये करंज झाडाची पाने ठेवली जातात. त्या मुळे फळे पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया होऊन त्याला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. भाताच्या पावळीचा वापरही केला जातो. मात्र उत्पादन नसल्याने बांबूच्या टोपाल्यांची मागणी घटल्याने बुरूड व्यवसाय करणाºया महिला व्यवसायिकांना झळ पोहचणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी फळे पॅकेजिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. मात्र नैसर्गिक आपत्तीने स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम केला आहे.
हवामानातील बदलाने या वर्षी आंबा पीक वाया गेले आहे. फळांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. साधारणत: एप्रिल मध्यानंतर तयार हापूस आंबा मलेशियात निर्यात केला जातो. मात्र या वर्षी मागणी असूनही उत्पादन नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.
- यज्ञेश सावे, कृषीभूषण