दुचाकी चोरणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:55 PM2023-02-12T15:55:50+5:302023-02-12T15:56:12+5:30
माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दहिसर येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा:- माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दहिसर येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी २ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नायगावच्या उमेळे येथे गार्नेट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निहाल घरत (३१) यांनी नायगाव पश्चिम रेल्वे ब्रिजच्या बाजूला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पार्क करून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी चोरट्यांनी चोरी करून पळवून नेली होती. माणिकपूर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चंद्रेश गणेशप्रसाद पाठक (२३) याला दहिसर येथे सापळा कारवाई करुन ताब्यात घेतले. त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला अटक केली आहे. अटक आरोपीकडून दुचाकी चोरल्याचे सांगितले. आरोपीकडून ३ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. माणिकपुर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघड केले असून इतर ३ गुन्हयांचा तपास चालु आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपुरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तडवी, तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार चौधरी, पाटील, चंदशिवे, चव्हाण, कानडे यांनी केली आहे.