रिक्षात गहाळ झालेले ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र मणिकपूर पोलिसांनी दिले सापडून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 05:17 PM2023-10-30T17:17:36+5:302023-10-30T17:18:15+5:30
ही माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- रिक्षामधून प्रवास करताना गहाळ झालेले २ लाख १० हजारांचे ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र मणिकपूर पोलिसांनी परत मिळवून दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
एव्हरशाईन सिटीतील साई सुमन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सपना सडवेलकर (४३) या २७ ऑक्टोबरला संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर निघाल्या. त्यांनी एव्हरशाईन सर्कल ते वसई रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी एव्हरशाईन सर्कल रिक्षा स्टॅण्ड येथून रिक्षा पकडली. या प्रवासा दरम्यान त्यांचे २ लाख १० हजार रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजानचे मंगळसुत्र गहाळ झाले. त्यांनी मणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी गहाळ रजिस्टरमध्ये मिसिंग दाखल केली. या घटनेच्या अनुषंगाने माणिकपूरचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी एव्हरशाईन सर्कल परिसरातील १० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन महिलेने प्रवास केलेल्या रिक्षाचा क्रमांक प्राप्त केला. त्यावरून रिक्षा चालकाचा शोध घेवुन त्याचेकडे गहाळ झालेल्या मंगळसुत्राबाबत बारकाईने व कौशल्याने विचारपुस करुन तक्रारदार यांचे गहाळ झालेले मंगळसुत्र हस्तगत करुन त्यांना परत केले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, मणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) ऋषिकेश पवळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे व प्रविण कांदे यांनी केली आहे.