माणिकपूर पोलिसांनी ४४ मोबाईल केले नागरिकांना परत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 06:27 PM2022-10-05T18:27:47+5:302022-10-05T18:29:02+5:30
माणिकपूर पोलिसांनी ४४ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत.
मंगेश कराळे
नालासोपारा : मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता तुळींज पोलिसांनी खोडून काढली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चोरी झालेले तब्बल ४४ मोबाईल माणिकपूर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अडीच लाख रुपये किंमतीचे एकूण ४४ मोबाईल शोधून काढले आहे. वसईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मालकांना परत देण्यात आले. यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हेगारी, मोबाईल चोरीपासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या टीमने अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.