वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:02 PM2020-04-10T17:02:48+5:302020-04-10T17:03:29+5:30
वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत.
- आशिष राणे
वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नोंदणीकृत वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत.
या प्रकरणी तसे आदेश 8 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना खासगी वाहन चालकांना पेट्रोल, डिझेल विक्री मनाई करण्यात आली आहे, दरम्यान जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून वसईत माणिकपूर नाक्यावरील बसीन पेट्रोल पंपावर खासगी वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री गुरुवारी देखील सर्रास सुरू असल्याचे प्रत्यक्ष पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या माणिकपूर येथील बसीन पेट्रोल पंप मालक, मॅनेजर आणि पंपावरील कामगार यांच्या विरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. 147/2020 नुसार विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात पेट्रोल पंपावर मोठया प्रमाणावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी पालघर यांनी तसे विक्री मनाई आदेश देण्यात आले होते.
100 रुपयांची पेट्रोल विक्री भोवली !
जिल्हाधिकारी पालघर यांनी बुधवार 8 एप्रिल रोजी सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना अत्यावश्यक सेवा वाहन सोडून इतर खासगी वाहनांसाठी विक्री बंद करण्याचे आदेश काढले, या आदेशानुसार वसई उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक राहुल कसबे यांना माणिकपूर पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलची विक्री सुरू असल्याचे समजलं व त्यांनी माणिकपूर पेट्रोल पंप येथे येऊन एका कामगारांकडून 100 रुपये देऊन आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घेतले, तेव्हा लक्षात आले की, इथे खासगी वाहनचालकांची चौकशी न करताच पेट्रोल डिझेलची विक्री होत आहे. हे स्पष्ट झाल्यावर फिर्यादी पोलीस नाईक राहुल कसबे यांनी गुरुवार 9 एप्रिल रोजी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून माणिकपूर पेट्रोल पंप मालक, मॅनेजर व कामगार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला.