मनोरचा रस्ता पुन्हा झाला जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:29 PM2017-07-26T23:29:50+5:302017-07-26T23:30:11+5:30
मनोर - पालघर रस्त्यावर मनोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पडलेले खड्डे मनोर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दगड, मातीने बुजविण्यात आले होते
मनोर : मनोर - पालघर रस्त्यावर मनोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पडलेले खड्डे मनोर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दगड, मातीने बुजविण्यात आले होते. मात्र, पावसाच्या एका फटक्याने ही मलमपट्टी नष्ट झाल्याने रहिवाशांचे हाल सुरूच राहिले आहेत. उद्घाटनात येणारे पुढारी व शासकीय अधिकाºयांना त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली होती का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मनोर ग्रामपंचायत परिसरासाठी मनोर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन २० जुलै पालघर जि.प. अध्यक्ष सुरेखा थेतले व आमदार विलास तरे यांच्या हस्ते मोठ्या थाटा माटात करण्यात आले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, माजी मंत्री राजेंद्र गावित, कार्यकारी अभियंता अण्णा निर्भवणे, महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घडपडे तसेच जि.प. व पं.स. सदस्य काँग्रेस सेना, भाजप, बहुजन विकास आघाडी, राष्टÑवादी कॉँग्रेस अशा अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मनोर ग्रामपंचायत तर्फे पडलेल्या खड्ड्यात माती व रॅबीट टाकून ते बुजविण्यात आले होते.
कारण येणाºया अधिकारी व आमदार, माजी मंत्री, व इतर शासकीय अधिकाºयांना त्रास होऊ नये त्यांच्या गाड्या खड्डयांमध्ये अडकल्या असत्या तर कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला असता. ते घडू नये म्हणून ही तात्पुरती मलमपट्टी केली गेली. दोन महिन्यांपासून पडलेले खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करणाºया मनोर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जाग आली पण आता पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डे भरण्यासाठी पुन्हा एखाद्या कार्यक्रमाची वाट पहावी लागेल का अशी चर्चा सुरू आहे. किसन भुयाल सचिव आदिवासी ऐकता मित्रमंडळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सवाल केला की, ग्रामपंचायतीने गटारी साफ न केल्याने सर्व पाणी रस्त्यावर येऊन पडलेले खड्डे आता बुजणार कधी?