उर्दू शाळांमध्ये नेमले मराठीचे शिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:07 AM2018-08-13T03:07:54+5:302018-08-13T03:08:09+5:30
शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे.
वाडा - तालुक्यात कुडूस, उसरकॅम्प, खानिवली या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन उर्दू प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यातील शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. हा निर्णय घेतांना मराठीचे शिक्षक उर्दू शाळेतील मुलांना काय शिकविणार? हा साधा विचारही न केला गेल्याबद्दल मुस्लिम पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ही माहिती घेत असतानाच शिक्षण विभागाच्या व्यवस्थापनाचा एकूणच उडालेला बोजवारा समोर आला. तालुक्यात उंबरपाडा, गाळे, पाहुणीपाडा, कोळकेवाडी, तीळमाळ या शाळांत विद्यार्थी पटसंख्या ५ ते ६ एवढीच असताना त्यांच्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमधील एकेका शिक्षकाची उर्दू शाळेवर तात्पुरती नेमणूक योग्य ठरली असती पंरतु तसे न करता कुडूस, वडवली, आब्जे या मोठा पट असलेल्या शाळांतील एकेक शिक्षक उर्दू शाळेत नियुक्त केले आहेत. विशेषत: वडवली शाळेची १ ली ते ५ वीची पटसंख्या ४० असतांना एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळतो त्यांच्या कार्यक्षमतेचा विद्यार्थी संख्येचा विचार केलेला नाही तर गातेस खुर्द या २९ पटसंख्या असलेल्या शाळेच्या शिक्षिका रजेवर जाताच तिथे पर्यायी शिक्षक लगेच दिला गेला, म्हणजे मजीनुसार सोय आणि गैरसोय असा व्यवस्थापनाचा मनमानी कारभार दिसून येतो.
उर्दू शाळांतील मोठा पट असलेल्या शाळांतील मुलांची गैरसोय दूर करण्यासाठी ५ ते ६ एवढी कमी पट असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत ठेवण्याच्या धोरणाचा पुर्नंविचार होण्याची गरज आहे.
आधी ही विसंगती दूर करा
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधा देण्याच्या तसेच गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम सुरू होत आहेत.
परंतु त्याआधी एकेकाळी जीवन शिक्षण विद्यामंदिर असे नाव असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील पट आणि शिक्षक यातील विसंगती दूर व्हावी.