मराठमोळा गुढीपाडवा साधेपणानेच!, कोरोना प्रादुर्भावामुळे शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:45 PM2021-04-13T23:45:13+5:302021-04-13T23:45:28+5:30
Gudi padva : ठिकठिकाणी साधेपणानेच मराठमोळी गुढी उभारण्यात आली. घरोघरी गुढी उभारली गेली मात्र प्रत्यक्ष भेटून कोणीही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाही.
विरार : गुढीपाडवा सण हा मराठी नववर्ष म्हणून ओळखला जातो. या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी वसईकर नागरिक दरवर्षी शोभायात्रांचे आयोजन करतात. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने शोभायात्रा आयोजिल्या नव्हत्या. तर यंदादेखील शोभायात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसईकरांनी रद्द केले.
ठिकठिकाणी साधेपणानेच मराठमोळी गुढी उभारण्यात आली. घरोघरी गुढी उभारली गेली मात्र प्रत्यक्ष भेटून कोणीही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाही. गुढीपाडवा हा नवचैतन्याचा सण. घराघरात गोड पदार्थ केले जातात. दारात गुढी उभारली जाते. नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. शोभायात्रांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा वसई-विरारमध्ये पाडव्यानिमित्त घरोघरी केवळ गुढी उभारलेल्या दिसल्या. गोडाचा नैवेद्य केला गेला. मात्र दरवर्षीप्रमाणेचा उत्साह यावर्षी पाहायला मिळाला नाही. दारोदारी, चौकात रांगोळ्या दिसल्या नाही. शोभायात्रा नागरिकांनी स्वतहून रद्द केल्या. अतिशय शांततेत आणि साधेपणाने गुढीपाडव्याचा सण साजरा झाला.