विनयभंग करणाऱ्या सरपंचाचा राजीनामा फेटाळला
By admin | Published: June 4, 2016 01:14 AM2016-06-04T01:14:03+5:302016-06-04T01:14:03+5:30
नोकरीच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सत्पाळ्याच्या सरपंचाचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने जन आंदोलनच्या संतप्त महिला सोमवारी (६ जून) पंचायत समितीवर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.
वसई : नोकरीच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सत्पाळ्याच्या सरपंचाचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने जन आंदोलनच्या संतप्त महिला सोमवारी (६ जून) पंचायत समितीवर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.
एका तरुणीने फिर्याद दिल्यानंतर सत्पाळ्याचे सरपंच अनिल ठाकूर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. तरीही सरपंच ठाकूर ग्रामपंचायतीत येत असल्याने महिला विशेष ग्रामसभेत त्यांच्या राजीनाम्याचा ठराव एकमताने मंजूरही झाला. त्यानंतर आदिवासी एकता परिषदेने ठाकूरच्या राजीनाम्यासाठी सत्पाळा नाक्यावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. तर जन आंदोलन समितीच्या महिलांनी या प्रकरणी ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, उपसभापती, सभापती, आमदार, पोलीस यांच्याकडे लेखी पाठपुरावा केल्यामुळे अनिल ठाकूरने राजीनामा पंचायत समितीला सादर केला होता. मात्र, हा राजीनामा फेटाळण्यात आल्याचे वृत्त येथील महिलांना समजले. त्यामुळे या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जन आंदोलनाच्या महिला विभागप्रमुख अॅड़ ज्योती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्या सोमवारी पंचायत समितीला धडकणार आहेत.