सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 11:48 PM2020-12-23T23:48:07+5:302020-12-23T23:49:35+5:30
Palghar : पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील
पालघर/बोर्डी : मुंबईत ड्रग्जमाफियांवर पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून छापेसत्र सुरू असल्याने, ते लगतच्या उपनगराकडे वळले आहेत. तेथेही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नाताळ आणि ३१ डिसेंबर या काळात पालघर जिल्ह्यातील सागरी पर्यटनस्थळांना हे माफिया लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, येथील सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वसई, कळंब, अर्नाळा, राजोडी, कोरे, उसरणी, केळवे, चिंचणी, पारनाका, चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाई ही सागरी पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. यापैकी बहुतेक चौपाट्या वस्तीपासून लांब आणि गर्द सुरू बागांनी वेढलेल्या असल्याने निर्मनुष्य अशा या भागात नीरव शांतता असते. त्यामुळे बाहेरून आलेले पर्यटक आणि स्थानिक यांचा संबंध कमी येतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आठ महिने हॉटेल व्यवसायाने मंदीचा सामना केला आहे. नाताळ आणि ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांना विशेष कार्यक्रम आणि सवलतीचे पॅकेज देऊन पर्यटकांना आकर्षित करून, या व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न या व्यावसायिकांकडून केला जात आहे. सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्युनंतर मुंबईत ड्रग्जमाफियांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू झाल्याने, त्यांनी उपनगरांकडे मोर्चा वळविला आहे. मात्र, तेथेही कारवाई सुरू झाली आहे. नाताळ ते नवीन वर्ष या काळात शहरी पर्यटक विविध भागांतून पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला पसंती देतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता, राज्य शासनाने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
पाेलिसांचीही असणार नजर
यंदा ग्रामीण भागातील सागरी पर्यटनस्थळांना ड्रग्ज पेडलर्स लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी विभागाला सक्रिय राहण्याची गरज आहे. या काळात होणारे विविध कार्यक्रम आणि पर्यटनस्थळांवर वावरणारे पर्यटक यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.