विरारमध्ये होते आहे बाजारामुळे वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:06 PM2019-06-11T23:06:15+5:302019-06-11T23:06:37+5:30
विरारमध्ये आठवडे : बाजारामुळे वाहतूक कोंडी
विरार : पश्चिमेला आठवड्यातून दोन दिवस आठवडे बाजार भरविला जातो. त्यासाठी येणारे नागरिक आपल्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क करीत असल्याने वाहतूककोंडीत वाढ होऊ लागली आहे. तसेच बाजारातील फेरीवाले हे हळूहळू रस्त्यावर आपले बस्तान मांडत आहेत. मात्र, महानगरपालिका व वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
हा आठवडे बाजार पूर्वी एक दिवस (मंगळवारी) भरवला जात होता. पण काही महिन्यांपूर्वी जकात नाका मैदानात मंगळवार व शनिवार असे दोन दिवस तो भरविला जात आहे. या मैदानासमोरील रस्ता हा मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात वाहने इथून ये-जा करतात. तर बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मैदानात जागा असतांनाही महानगरपालिकेने पार्किंगची योग्य सोय केली नसल्याने नागरिक बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला तसेच नो पार्किंग लिहिलेल्या ठिकाणी सुद्धा गाड्या उभ्या करतात. यामुळे अर्धा रस्ता हा अनधिकृत पार्किंगमुळे व्यापला जातो. तसेच फेरीवाले फुटपाथची जागा देखील व्यापून टाकतात. ज्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही.
ज्या मैदानात हा बाजार भरवला जातो त्या समोरील हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने अवजड वाहने देखील त्याचा उपयोग करतात. ग्राहकांच्या शोधात चालक रिक्षा भर रस्त्यात उभ्या करतात यासर्व कारणांमुळे वाहतूककोंडीमध्ये वाढ होत आहे. आठवडे बाजार हा नागरिकांना स्वस्त दरात वस्तू मिळाव्यात, यासाठी भरविण्यात येतो, पण आता त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ लागला आहे.
महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाल्यांची मनमानी सुरु आहे. महानगरपालिका यावर कारवाई करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ती बदलणार तरी कधी? असा सवाल नागरीक करीत आहेत.
फुटपाथ वरून चालण्याची सोय नाही त्यामुळे आम्ही रस्त्याचा उपयोग करतो, पण आता रस्त्यावर गाड्या कशाही उभ्या केल्या जातात. इतकेच नाही तर रिक्षा चालकांचा हैदोस असतो. नेमकं कुठून जावं तेच कळत नाही.’’
- विठू शेटे, नागरीक
माझं आॅफिस या बाजूला असल्याने मी रोज या रस्त्याचा वापर करते. माझी दुचाकी आहे, पण मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी हा रस्ता संपूर्ण जाम असल्याने बराच वेळ कोंडी पार करण्यात जातो.
-अर्पिता जाधव, नागरीक