विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:05 PM2019-06-13T23:05:41+5:302019-06-13T23:05:52+5:30
शारिरीक छळ : पती, सासू, सासरा, नणंदा यांनी केले प्रवृत्त
नालासोपारा : वसई पूर्वेकडील मधुबन टाऊनशीपमधील उत्सव अॅव्हेन्यूमधील सदनिका नंबर १०४ मध्ये ९ जूनला संध्याकाळी नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मानसिक व शारीरिक छळ करून १० लाख रुपये आणि कार आणण्याचा सासरच्यांनी तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार माहेरच्यांनी केली म्हणून मंगळवारी पोलिसांनी पती व तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
बिहार राज्यातील पाटणा येथे राहणाऱ्या रिना ऋषिकेश वर्मा (६२) यांची मुलगी जोतिबाला (२९) हीचे बिहारमधील विमल वर्मा याच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यावर आईने १७ लाख रुपये रोख आणि १० लाखांचे सोन्याचांदीचे दागिने व घरगुती सामान दिले होते. जोतिबाला आपल्या सासरच्या मंडळीसोबत वसई पूर्वेकडील मधुबन टाऊनशीपमधील उत्सव अॅव्हेन्यूच्या सदनिका नंबर १०४ मध्ये राहत होती. गेल्या काही वर्षांपासून पती, सासू, सासरा आणि इतर माहेरच्या लोकांनी जोतिबाला १० लाख रुपये अणि कार माहेरून आणण्यासाठी तगादा लावला होता. जोतिबाला एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होती पण तिचा पगार सासरची मंडळी जबरदस्तीने घेत होते. आईकडून १० लाख रुपये आणणार नाही तोपर्यंत माहेरी जाऊ देणार नाही, असे बोलून त्रास रोज द्यायचे. ती गर्भवती राहिल्यावर सासरची मंडळीनी तिला मूल नको म्हणून धमकी देऊन मारहाण करायचे. पोलिसांनी नवरा विमल, सासू मीना , सासरा विजय , नणंद दीपा, तिचा नवरा अविनाश आणि नणंद सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बहिणीच्या घरी घेतला गळफास
त्रासाला कंटाळून जोतिबाला आपल्या बहिणीच्या घरी गेली व ९ जूनला संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या मुलीच्या मृत्यूला सासरचे मंडळी जवाबदार असल्याची तक्र ार वालीव पोलीस ठाण्यात रिना वर्मा यांनी दिली.