मंगल कार्यालय गेले पाड्यामधून ‘चोरीस’
By admin | Published: September 19, 2016 03:00 AM2016-09-19T03:00:20+5:302016-09-19T03:00:20+5:30
आदिवासी विकास प्रकल्प विभागाची तब्बल ९ लाख ९९ हजार ५३० रुपये मूल्याच्या मंगल कार्यालयाची इमारतच ‘चोरी’ला गेली
हितेन नाईक,
पालघर- जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावातील घोडीचा पाडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाची तब्बल ९ लाख ९९ हजार ५३० रुपये मूल्याच्या मंगल कार्यालयाची इमारतच ‘चोरी’ला गेली असून संबधित दोषीं विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ठक्कर बाप्पा योजनेद्वारे तीन वर्षात जिल्ह्यातील कामांचे आयआयटी मुंबईमार्फत आॅडिट करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमत ला दिली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने खुडेदच्या घोडीचापाडा येथे मंगल कार्यालय उभारण्या साठी निधी उपलब्ध करून दिला होता. हे मंगल कार्यालय शोधायचा प्रयत्न लोकांनी केला असता ज्या पाड्यात ही वास्तू उभारल्याचे दाखवण्यात आलंय त्या पाड्यातच नव्हे तर परिसरातील अन्य कोणत्याही पाड्यात असे मंगल कार्यालायच बांधण्यात आल्याचे त्यांना आढळून आले नाही. त्यामुळेच हे मंगल कार्यालय कुणी ‘चोरून’ तर नेले नाही ना? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जे वास्तव समोर आले ते पाहून या विभागांतील अधिकारी भ्रष्टाचाराला किती चटावलेले आहे हेच समोर आले.
आपल्या पाड्यात मंगल कार्यालय उभारण्यात आल्याचे दाखवून ९ लाख ९९ हजार ५३० रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याची कुणकुण काही ग्रामस्थांना लागल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला. नंतर यासंबंधीची कागदपत्रे गोळा केली असता प्रत्यक्षात उभे न राहिलेल्या मंगल कार्यालयासाठी दोन्ही विभागाने सरपंचांंच्या संगनमताने १० लाखाचा निधी उकळल्याचे वास्तव समोर आले. त्यानुसार मग जव्हार प्रकल्पाधिकारी बाबासाहेब पारधे यांचेकडे तक्र ार करण्यात आली
त्यांनी गाव व पाड्यांना भेट दिली असता त्यांनाही तेथे मंगल कार्यालय अस्तित्वातचं नसल्याचे आढळून आले. त्यांनी तसा पंचनामा करून अहवाल सादर केल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनीही या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
त्यामुळेच या मंगल कार्यालयाची ‘चोरी’ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कधी कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
>न झालेल्या इमल्याचा अहवाल सादर
सन २०१४-१५ मध्ये या मंगलकार्यालायच्या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये हे काम सुरु झाले व ५ जानेवारी १६ मध्ये पूर्ण झाल्याचे कागदोपत्री अगदी बेमालुल पणे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर पुढे ज्या विभागाकडून यासाठी निधी उपलब्ध झाला. त्या जव्हारच्या आदिवासी विकास विभाग व ज्या विभागाने हे काम पुर्ण केले त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ जानेवारी २०१६ रोजी संयुक्त पाहणी करून हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केला आहे.
खुडेद ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रदीप पाडवी यांनीही सदर मंगल कार्यालय पूर्ण झाले असून ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची हरकत नसल्याचा दाखला प्रकल्प अधिकारी यांना सादर करून ह्या बेकायदेशीर कामाला पाठिंबा देण्याचे काम केल्याचे दिसून आले आहे.
फोटो शॉप चा बेमालूम वापर
मंगल कार्यालयाच्या ‘चोरी’साठी साधे पुरावे देऊन भागणार नाही म्हणून या विभागाने मंगल कार्यालयाच्या वास्तूच्या कामाच्या पूर्ततेचा फलक बनवून एका वेगळ्याच इमारतीला मंगल कार्यालय म्हणून दाखविले आहे फोटोशॉपचा बेमालूम वापर करून बनावट वास्तूसह छायाचित्रही सादर केले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कपट, कारस्थान करून भलतीच इमारत मंगल कार्यालय म्हणून दाखविली व त्यासाठीचा १० लाखाचा निधी हडप करून त्याचे पद्धतशीर वाटपही केल्याचे समजते.