तारापूर मंडळ कार्यालयावर मार्क्सवाद्यांचा मोर्चा
By admin | Published: February 21, 2017 05:14 AM2017-02-21T05:14:43+5:302017-02-21T05:14:43+5:30
जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त,
बोईसर : जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, युवक व महिलाचा तारापूर (कुरगांव) मंडळ कार्यालया वर मोर्चा काढण्यात आला होता.
जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. बळीराम चौधरी, जिल्हा सेक्रेटरी कॉ. संज्योत राऊत, तालुका सेक्रेटरी, कॉ. महेश बारगा, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. राजेश दवणे, कॉ. श्याम नाईक, कॉ. प्रमिला हाडल, कॉ. साईनाथ तामोरे, कॉ. प्रतिक्षा धनु, कॉ. सुरेखा तामोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये तारापूर अणूविद्युत प्रकल्पातील कामावरून कमी केलेल्या व बीएआरसी मधील कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय द्या, तारापूर अणू विद्युत प्रकल्पातील बंद केलेली रोजगाराभिमुख सर्व कंत्राटी कामे पुन्हा सुरु करा, सर्व कामगारांना किमानवेतन मिळालेच पाहिजे, योग्य देखभाली अभावी प्लॅँट व टॅप्स कॉलनीच्या गार्डन मधील झाडे सुकून जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी गार्डनची कामे पूर्ववत सुरु करा, टॅप्स १ ते ४ मधील ज्या कंत्राटदारांनी कामगारांची ए टी एम कार्डे स्वत: जवळ ठेवली आहेत. ती कामगारांना परत द्या, एमआयडीसी मध्ये आठ तास कामाची वेळ अमलात आणा, जी कामे वर्षानुवर्षे कायम स्वरूपात चालतात तिथे कामगारांना कायमस्वरूपी काम मिळाले पाहिजे.
पोफरण व अक्कपट्टी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या. सर्व प्रकल्पग्रस्तांचे सुयोग्य पुनर्वसन करा, एनपीसीआयएल व तारापूर एमआयडीसीमधील सीएसआर फंडाचा निधी हा परिसराच्या विकासासाठीच वापरला जायला हवा. हा निधी अन्यत्र वळवणे बंद करा. तसेच त्याच्या विनिमयाची नियमावली बनवा, तारापूर अणूविद्युत प्रकल्पाला भारताचे न्यूक्लिअर डंपिंग ग्राउंड बनवणे बंद करा, न्यूक्लिअर वेस्टचे योग्य व्यवस्थापन करा, बारहजारी ते पाचमार्ग रस्त्याची दुरु स्ती करा व या रस्त्याची कायमस्वरूपी देखभाल करा, तारापूर अणूविद्युत केंद्रासाठी आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून दांडी ते नवापूर दरम्यान पूल बांधा, तारापूर अणूविद्युत केंद्राजवळील पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रात पक्क्या रस्त्यांचे जाळे वाढवा, वाढवण व आलेवाडी येथील नियोजित बंदर प्रकल्प रद्द करा. समुद्री पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्प रद्द करा अशाविविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)