पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्क्सवाद्यांचा मोर्चा, सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:08 AM2019-11-26T00:08:07+5:302019-11-26T00:09:14+5:30
अनेक मागण्यांसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. रडका कलांगडा यांच्या नेतृत्वाखाली, डहाणू पारनाका ते सहा. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो आदिवासी स्त्री - पुरुषांनी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
डहाणू : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, तत्काळ नुकसानभरपाई देण्यात येऊन, त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, तसेच भूकंपात नुकसान झालेल्या नागरिकांना सहाय्य करून दक्षतेच्या उपाय योजना राबविण्यात याव्यात, आरोग्य, शिक्षण, विद्युतीकरण, सार्वजनिक वितरण व्यवस्था, समाज कल्याण योजना, अशा प्रलंबित योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात यावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. रडका कलांगडा यांच्या नेतृत्वाखाली, डहाणू पारनाका ते सहा. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो आदिवासी स्त्री - पुरुषांनी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, तसेच लहान व्यावसायिक, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक यांच्या ज्वलंत प्रलंबित असलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचबरोबर वृद्ध, विधवा, अपंग, लाभार्थ्यांना सहाय्य करणे, कृषी विकास आणि मत्स्य व्यवसायाला संरक्षण देण्यात यावे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचप्रमाणे नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रदूषण रोखण्यात यावे, अशा अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले, कॉ.लहानी दौडा, किसान सभा सचिव, चंद्रकांत वरठा, किसान सभा अध्यक्ष, चंद्रकांत घोरखना, डी.वाय.एफ.आय.चे रामदास सुतार, चंदू कोम, बच्चू वाघात, रमेश घुले, रडका गोवारी आदी सहभागी झाले.
शेतक-यांचे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन
विक्रमगड : तालुक्यातील शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेली पिकांचे नुकसान होऊन मातीमोल झाली आहेत. भात शेती कुजून १०० टक्के नुकसान झाले. ज्वारी, उडीद, तूर, भुईमुग, खुरासनी, ही सर्व पिके उद्ध्वस्त झाली. याचे शासन पातळीवर पंचनामे करण्यात आले. मात्र मिळणारी मदत तुटपुंजी आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकºयांना रू.२५ हजार रूपये एकरी देण्यात यावे, अशी मागणी माकपाच्या सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली.
शेतकºयांना एकरामागे २५ हजार रूपये देणे मंजूर करावे, वन अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करणे, कुर्झे येथील बेकायदेशीर चालू असलेला कत्तल खाना बंद करण्यात यावा, वाकी ग्रामदान मंडळ येथील निवडणुकीची चौकशी करणे, इंदिरा आवास, पंतप्रधान शबरी आदिवासी निवास योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे, विक्रमगड तालुक्यात उपजिल्हा रूग्णालय तयार करणे, तालुका कृषीमधील विविध योजनांची माहिती व आराखडा तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतीला माहिती देणे, आदिवासी प्रकल्पातून मिळणाºया योजनांची माहिती आदिवासी बांधवांना देण्यात यावी.
या सर्व मागण्या जोपर्यंत शासन देण्याचे मान्य करणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहील, अशी माहिती तालुका सचिव किरण गहला यांनी दिली अनेक प्रश्न जुने असून ते प्रलंबित आहे. परंतु शासन याकडे लक्ष देत नसल्याने हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.