सातपाटीमध्ये काढली मशालयात्रा
By admin | Published: September 17, 2016 01:45 AM2016-09-17T01:45:35+5:302016-09-17T01:45:35+5:30
इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर
पालघर : इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर हौतात्म्य पत्करलेल्या सातपाटीच्या हुतात्मा काशीनाथ भाई पागधरे या तरुणांचा जन्मदिवस (१४ सप्टेंबर) सातपाटी मध्ये जन्मशताब्दी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यांच्या बालिदानातून स्फूर्ती घेतलेल्या शेकडो तरुणांनी गावात मशाल यात्रेचे आयोजन करीत त्यांना मानवंदना दिली.
१२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी सुरु वात केलेल्या दांडी यात्रेनंतर पालघर तालुक्यात स्वातंत्र्य लढ्याला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आलेल्या म. रा.गोसावी वकील आदींनी प्रथम सातपाटीच्या श्रीराम मंदिरा समोर मोठी सभा घेऊन काळ्या टोप्या आणि परदेशी कपड्यांची होळी केली. आणि सातपाटी गावातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य संग्रामाच्या धुगधुगीला सुरु वात झाली. त्या वेळे पासून सातपाटी हे स्वातंत्र्य संग्रामात पालघर तालुक्यातील चळवळीचे केंद्र बनले.
स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदेशातून पेटून उठलेल्या सातपाटी मधील शेकडो स्वातंत्र्यवीरांनी त्यावेळी ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते. ७ व ८ आॅगस्ट रोजी मुंबईच्या गवळी तलाव मैदानावर भरलेल्या काँग्रेस महाअधिवेशनातील ‘चले जावं’ च्या घोषणेचे पडसाद देशासह सातपाटीतही उमटले. धर्माजी तांडेल आदी नेते आणि नारायण दांडेकर, भुवनेश कीर्तने, मारुती मेहेर यांच्या भाषणा नंतर एक अपूर्व क्रांतीची ज्योत पेटून चंद्रभागा मेहेर, मंजुळा तरे, तुळसा पाटील, हिरु बाई मेहेर इ, महिलांसह काशीनाथभाई व रामचंद्र पागधरे, पंडित मेहेर, बाबुराव पाटील इ,सह ७०० ते ८०० तरुण पालघरच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी त्वेशाने निघाले. १३ आॅगस्ट रोजी सात ते आठ हजारांचा जनसागर पालघरमध्ये जमल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मोर्च्यातील नांदगावच्या चिंतू नाना पाटील यांना इंग्रजांचे सरकारी अधिकारी आल्मीडा यांनी रोखून शिवी हासडल्याने तरुणवर्ग भडकला अशा वेळी नांदगावच्या गोविंद गणेश ठाकूर यांनी ध्वज हातात घेवून वंदे मातरमची घोषणा करीत कचेरीच्या दिशेने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आल्मीडा ने झाडलेली गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. पेटून उठलेल्या काशिनाथभार्इंनी त्याच वेळी हातातील ध्वज फडकवीत पुढे कूच केली.पण इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्यांच्या कपाळाचा वेध घेतला आणि ते धारातीर्थी पडले.