इलेक्ट्रिक पॅनल बनविणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, ८ गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 06:16 PM2022-09-28T18:16:30+5:302022-09-28T18:17:51+5:30
स्फोटामुळे जवळपासचे आणि कंपनीचेही नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा (मंगेश कराळे): वसई तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कॉस पावर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इलेक्ट्रीकल पार्ट्स आणि पॅनलबोर्ड बनविणाऱ्या कंपनीत हारड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सदर स्फोटात ३ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर ८ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले आहे. आग विझवण्यात आली असून कुलिंगचे काम सुरू असल्याचे कळते. कंपनीत आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते. स्फोटामुळे जवळपासचे आणि कंपनीचेही नुकसान झाले आहे.
वसईच्या चंद्रपाडा भागात कॉस पावर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रिक पार्ट्स आणि पॅनल बनवले जाते. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनीत हारड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अपघातावेळी कंपनीत अनेक कामगार काम करीत होते. या अपघातात तीन कामगार जिवंत भाजले आहेत. तर ८ कामगार गंभीर भाजले. अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्व्हे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मनपाचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीत मदतकार्य सुरू आहे. कंपनीत कामगार अडकल्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
ज्या कंपनीत हा अपघात झाला त्या कंपनीला नेमक्या कोणकोणत्या परवानगी आहेत, येथे नेमके काय घडले आहे याची चौकशी केली जाणार आहे. कंपनीत स्फोट झाल्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इथली परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची ओळख पटविणे आणि अजून यात कोणाचा मृत्यू झाला आहे का याचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले.