वसईत काळ्या गुळाचा प्रचंड साठा जप्त
By admin | Published: July 30, 2015 12:29 AM2015-07-30T00:29:52+5:302015-07-30T00:29:52+5:30
सरकारने कितीही निर्बंध टाकले तरी वसई-विरार उपप्रदेशात काळा गूळ व गुटखा यांची आवक सुरूच आहे. परराज्यांतून येणारा हा प्रतिबंधित माल रोखण्यासंदर्भात एक्साइज व
वसई : सरकारने कितीही निर्बंध टाकले तरी वसई-विरार उपप्रदेशात काळा गूळ व गुटखा यांची आवक सुरूच आहे. परराज्यांतून येणारा हा प्रतिबंधित माल रोखण्यासंदर्भात एक्साइज व पोलीस विभाग अपयशी ठरले आहेत. मंगळवारी वसई पश्चिमेस रानगाव परिसरात एका पथकाने काळ्या गुळाचा प्रचंड साठा जप्त केला. तलासरी येथे तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी होत असताना हा माल वसईपर्यंत पोहोचतो कसा, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात अर्नाळा, रानगाव, अर्नाळा किल्ला, बोळिंज, आगाशी व अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या लागत असतात. या दारूसाठी आवश्यक असलेला काळा गूळ पश्चिम महाराष्ट्र तसेच शेजारच्या गुजरात राज्यातून येत असतो. मध्यंतरी मुंबईच्या मालाड येथे झालेल्या दारूकांड घटनेनंतर पोलिसांनी निरनिराळ्या ठिकाणी धाडी टाकून गावठी दारू व साहित्य जप्त केले होते. त्यानंतर, काही काळ हे सर्व दारूचे अड्डे बंद झाले. कालांतराने पुन्हा ते जोमात सुरूही झाले. काल रानगाव मर्सीस परिसरात धाडी टाकून ७० पोत्यांत दडविलेला काळा गूळ पोलिसांनी जप्त केला. गुटखासेवनावरही बंदी असताना उपप्रदेशातील अनेक पानपट्ट्यांवर गुटखा सर्रास विकला जातो. (प्रतिनिधी)