सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:53 PM2018-05-31T23:53:04+5:302018-05-31T23:53:04+5:30

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे.

Matching new abbreviations in all the sides | सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

Next

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील सत्ता समीकरणे बदलली जाणार आहेत. राजेंद्र गावितांचा विजय झाला असला तरी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे आणि राज्यकार्यकारणी सदस्य बाबाजी काठोळे यांना ज्यापद्धतीने मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेपासून दूर ठेवले आणि आपल्या विश्वासातील आमदार प्रविण दरेकर यांच्या हाती सगळी प्रचारसूत्रे दिली. ते सूचक होते आता या दृष्टीकोनातून भाजपमध्ये बरेच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. विक्रमगडचे नेते आणि विकास आघाडीचे सूत्रधार निलेश सांबरे यांच्यारुपाने भाजपाच्या हाती मोठा नेता लागला आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत महत्वाचे पद मिळू शकते. तसेच ते भाजपचे एखाद्या मतदारसंघातील उमेदवारही ठरू शकतील. पालघर जिल्ह्याला नवा जिल्हाध्यक्षही लाभू शकतो.
तसेच आगामी निवडणूकीच्या प्रचाराची सूत्रे प्रविण दरेकर यांच्याकडेच पुन्हा सोपविली जाऊ शकतात. पालघर जिल्ह्याची फारशी माहिती नसताना व तिथे शिवसेनेचा आमदार असताना त्यांनी भाजप उमेदवाराला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे. ते पाहता ते आता या मतदारसंघात भाजपला विजयाप्रती आश्वस्त करणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे त्यांचेच जिल्ह्यात आणि भाजपाच्या राज्यसंघटनेत महत्व वाढलेले आहे. तर या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य बाबाजी काठोळे यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. तसेच विष्णू सवरा यांच्याही स्थानाला धक्का लागू शकतो.
शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा जरी पराभूत झालेले असले तरी पहिल्याच निवडणूकीत निवडणूक मोहिमेचे सूत्रधार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक तसेच दोन नवनियुक्त जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांचे संघटनेतील महत्व निश्चितच वाढणार आहे.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्ता नर हे भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणीची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष केदार काळे यांचा कोणताही प्रभाव या निवडणूकीत न पडल्याने त्यांनाही नारळ मिळू शकतो. तर अनेकदा खासदारकी जिंकलेल्या शिंगडा यांना पडलेली ४७७१४ मते पाहता यापुढे त्यांचा उमेदवारीसाठी विचार होईल की नाही असा प्रश्न निर्माण होईल. काहीही झाले तरी मला किंवा माझ्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे या त्यांच्या अट्टाहासाला काँग्रेस यापुढे बळी पडणार नाही, असेही चित्र आहे. याचा अर्थ या मतदारसंघात काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल किंवा राष्टÑवादीसोबत आघाडी झाली तर हा मतदार संघ राष्टÑवादीला अर्पण करावा लागेल.

Web Title: Matching new abbreviations in all the sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.