उद्याने, तलावांवरील साहित्य नादुरुस्त; दुरुस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:42 AM2021-01-30T00:42:11+5:302021-01-30T00:42:42+5:30
नागरिकांची होते गैरसोय, गार्डन्स व तलावांवरील साहित्यांची नियमित देखभाल दुरुस्तीकामी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही.
नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेमार्फत प्रभाग समिती ‘जी’ कार्यक्षेत्रातील विविध उद्याने व तलाव विकसित करून सुशोभित करण्यात आलेले आहेत. मात्र बहुतांश उद्याने तसेच तलाव परिसरातील साहित्य नादुरुस्त झालेले असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
महापालिका क्षेत्रात गार्डन झोन, चिल्ड्रन प्ले झोन, ओपन जीम, जाँगिंग ट्रॅक, वॉटर फाऊंटन, बसण्याचे बँचेस, छोटी-मोठी झाडे, हिरवळ इत्यादींचा समावेश असून परिसरातील नागरिकांमार्फत त्यांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्यात येत आहे.
कोरोनामुळे मनपा हद्दीतील गार्डन्स व तलाव जवळपास ९-१० महिन्यांपासून बंद होते. सध्या कोरोनाचा ओसरता प्रभाव लक्षात घेता सदर सुविधा नागरिकांसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. कोरोनामुळे मोठ्या कालावधीसाठी गार्डन्स व तलावांवरील साहित्यांची नियमित देखभाल तथा दुरुस्ती झाली नसल्याने अनेक साहित्य नादुरुस्त झालेली आहेत. तसेच अनेक साहित्य तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिक व लहान बालकांची गैरसोय होत असून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत.
गार्डन्स व तलावांवरील साहित्यांची नियमित देखभाल दुरुस्तीकामी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. गार्डन व तलावांची देखभाल महिला बचत गटांमार्फत करण्यात येत असल्याने त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वेळप्रसंगी स्वखर्चाने दुरुस्तीकामे करून त्यांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मनपा गार्डन्स व तलावांवरील विविध साहित्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केलेली आहे.