बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 03:36 PM2022-03-22T15:36:32+5:302022-03-22T18:56:31+5:30
तर महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याने कारवाईची शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - महापौरांच्या प्रभागात झालेल्या बेकायदा भूमिपूजन प्रकरणी महापौरांच्या तक्रारी वरून भाजपच्या माजी आमदार व नगरसेवक आदींवर महापालिकेने गुन्हा दाखल केल्या नंतर आता महापौरांनी घुमजाव करत आपली काही तक्रार नाही . आपल्या मंजुरीने कार्यक्रम झाल्याचे सांगत महापालिकेला खोटे ठरवत गुन्हा रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे . तर आरोपीना वाचवण्यासाठी बेकायदा भूमिपूजनाचे समर्थन करून महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली असल्याने महापौरांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे .
महापालिकेने काशीमीरा पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी मीरा गावठाण येथील तलावाच्या कामाचे बेकायदा भूमिपूजन व बेकायदा बॅनर लावल्या प्रकरणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता , नगरसेवक सचिन म्हात्रे व सुजाता पारधी आदींसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . फिर्यादीत महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी पालिका आयुक्तां कडे तक्रार केल्या नंतर चौकशी करून त्यात तथ्य आढळल्याचे नमूद आहे .
महापौरांच्या प्रभागात महापौरांनाच डावलून झालेल्या ह्या बेकायदा भूमिपूजन वरून महापौरांनीच तक्रार केल्याने भाजपाच्याच लोकांवर दाखल गुन्ह्याने चांगलीच चर्चा रंगली . पण महापौरांनी आता पोलीस आयुक्त व काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना लेखी पत्र देऊन दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे .
पालिकेचा कार्यक्रम ठरवणे , पाहुणे बोलावणे हा महापौर नात्याने माझा अधिकार असून त्या अधिकाराचा वापर करून १३ मार्च रोजी आपण तलाव सुशोभीकरण व रस्ता उदघाटनचा कार्यक्रम आयोजित केला होता . मेहतांना मी निमंत्रित केले होते पण मला उपस्थित राहता आले नाही असा खुलासा महापौरांनी पत्रात केला आहे .
शिवसेनेने महापौरांवर कारवाईची मागणी केली आहे . कार्यक्रम घेण्याचे अधिकार महापौरांनी सांगितल्या नुसार असतील . पण प्रशासना कडून कार्यक्रमासाठी रीतसर निमंत्रण, आयोजन होते . शासन आदेश व महासभा ठराव नुसार स्थानिक आमदार , खासदार , विरोधी पक्ष नेता आदीना सुद्धा निमंत्रित करावे लागते . परंतु ज्या कामाचा कार्यादेश अजून निघाला नाही व प्रशासनाने अधिकृत आयोजन केले नसताना महापौरांनी बेकायदा कार्यक्रमास त्यांची मंजुरी व समर्थन असल्याचे सांगणे म्हणजे गुन्ह्यात त्यांचा सहभाग स्पष्ट होतो . शिवाय महापौरांनी आरोपीना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर केला असून त्यांनी पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली असल्याची टीका शिवसेनेचे पदाधिकारी रामभवन शर्मा यांनी केली आहे .