वसई-विरारच्या महापौरांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:41 AM2019-07-27T01:41:31+5:302019-07-27T01:41:35+5:30
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे मत : उमेश नाईक यांच्या नावाची चर्चा
नालासोपारा : वसर्ई - विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर रूपेश जाधव यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आणि हितेंद्र ठाकूर यांनी तो लगेच स्वीकारल्याने वसई-विरारमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. महापौरांच्या राजीनाम्यानंतर उमेश नाईक या पक्षातील वरिष्ठ चेहऱ्याला महापौरपदी बसण्याची संधी देण्यात येऊ शकते, सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.
पुढील वर्षी वसई-विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून महापौरपद हे राखीव वर्गासाठी असल्याने एका वर्षासाठी पक्षातील सर्वसाधारण वर्गातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास या पदावर बसण्याची संधी द्यावी, असा विचार करून महापौर पदाचा त्याग केल्याची भावना महापौर रूपेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाºयाच्या रणांगणात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मने जपण्यासाठी तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करून नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांची मोट बांधण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव यांना नालासोपाºयातून सपाटून मार खावा लागला होता. नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असतानादेखील येथे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना तब्बल २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. महापौर जाधव यांच्या आचोळ्यातील प्रभागातूनही राजीव गावित यांना मतांची आघाडी मिळाल्याने हितेंद्र ठाकूर नाराज होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही उमेदवारी प्रदीप शर्मा यांना देऊ केल्याचे समजते. उत्तर भारतीय मतांची मोट बांधण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा अंदाज आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतील नाराज कार्यकर्ते तसेच अंतर्गत दुफळी भरून काढण्यासाठी पक्षीय स्तरावर मोठे बदल करण्याच्या हालचाली बविआच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. राजीनामा हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जाधव हे एकमेव महापौर आहेत ज्यांनी एवढे मोठे पद दुसऱ्यांसाठी सोडले आहे. त्यांच्या या त्यागामुळे ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा स्वत:हून दिला आहे. जानेवारी २०१८ मध्ये महापौर पद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले होते. परंतु हितेंद्र ठाकूर यांनी माझ्यासारख्या दलित वर्गातील तरूणाला या पदावर विराजमान होण्याची संधी दिली. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराला महापौर पद मिळावे यासाठी स्वत:हून हा राजीनामा दिला आहे. - रु पेश जाधव (माजी महापौर, वसई विरार महानगरपालिका)