रस्ता बंदमुळे मीरा-भाईंदरकर वेठीस; वाहतूककोंडीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 10:55 PM2020-01-12T22:55:09+5:302020-01-12T22:56:11+5:30
महिनाभरापासून जलवाहिनीचे काम सुरू
भाईंदर : शहराच्या मुख्य मार्गावर मेट्रोच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होत असतानाच हाटकेश येथील महत्त्वाचा पर्यायी मार्गही महिनाभरापासून जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी बंद आहे. यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी होत असून कामामुळे रहिवासी संतापले आहेत. पाणीपुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक वेठीस धरले गेले आहेत. या कामासाठी अजून एक महिना जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मेट्रो-९ साठी छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे. आधीच या रस्त्यावर कोंडी होत असताना मेट्रोच्या कामामुळे कोंडीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे भाईंदरमधील नागरिकांनी काही प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. यात न्यू गोल्डन नेस्टपासून थेट हाटकेश चौक व पुढे महामार्गावर वेस्टर्न हॉटेलजवळ निघणाऱ्या मार्गाचा वापर वाढला आहे. शिवाय, घोडबंदर-अदानी पॉवर स्टेशनकडून हाटकेशला येणाºया रस्त्याचा वापरही आधीपासूनच केला जात आहे. परंतु, हाटकेशच्या या मुख्य
मार्गावरील रस्त्याची एक बाजू जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे गेल्या महिनाभरापासून बंद आहे. या भागात जलवाहिनी वरून असल्याने ती भूमिगत टाकण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. हा रस्ता एका बाजूने बंद केल्याने परिसरातील
रहिवाशांना आपली वाहने काढणे तसेच ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून घरांमध्ये धुळीचा थर साचत आहे. यामुळे काही जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.
मोठी जलवाहिनी जमिनीखालून टाकणे आवश्यक असल्याने हे काम पालिकेने हाती घेतले आहे. जमिनीच्या खाली अंतर्गत जलवाहिनी टाकली जात आहे. आणखी महिनाभर या कामासाठी लागणार असला, तरी भविष्यातील पाणीपुरवठा बाधित होऊ नये म्हणून काम आवश्यक आहे. कामादरम्यान माहितीसाठी फलक लावणे व नागरिकांचा त्रास कसा कमी होईल, यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. - चंद्रकांत वैती, उपमहापौर
महिनाभरापासून काम सुरू आहे. हा रस्ता बंद केल्याने नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीच्या नियमनासाठी तसेच कामाच्या माहितीचे
सूचनाफलक लावले नसल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी. नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - गोवर्धन देशमुख, रहिवासी