मीरा भाईंदर बीएसयूपी योजना घोटाळ्याचा तपास काशीमीरा पोलिसांकडून काढून गुन्हे शाखे कडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:01 AM2023-07-16T00:01:33+5:302023-07-16T00:03:41+5:30
यातील एक आरोपी भाजपा काशीमीरा मंडळचा अध्यक्ष असल्याने तसेच गुन्ह्यातील राजकीय लोकांचे हितसंबंध पाहता हा गुन्हा पहिल्या तपास अधिकाऱ्या कडून काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत झालेल्या घोटाळ्याचा तपास काशीमीरा पोलिसां कडून काढून तो आता गुन्हे शाखा युनिट १ कडे सोपवण्यात आला आहे . तर यातील एक आरोपी भाजपा काशीमीरा मंडळचा अध्यक्ष असल्याने तसेच गुन्ह्यातील राजकीय लोकांचे हितसंबंध पाहता हा गुन्हा पहिल्या तपास अधिकाऱ्या कडून काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे .
काशीमीराच्या जनता नगर आणि काशीचर्च झोपडपट्टीत इमारती उभारून फ्लॅट देण्याच्या बीएसयुपी योजनेत बनावट शिधावाटप पत्रिका, बनावट वीज बिल, करारनामे, बनावट सदनिका वितरणपत्र आदी मार्फत ७ जणांची फसवणूक केल्याचा गुन्हा २२ जून रोजी काशीमीरा पोलिसांनी दाखल केला आहे .
त्या गुन्ह्यात पोलिसांनी मंगल गांधी (४१) ; दयाशंकर यादव (३४) ; चंद्रप्रकाश चौहान (५४ ) ; नरसिंग भुरे (३६) ; हरीहरसिंह चौहान (५३) ; अमृतलाल पाल (५०) ह्या ६ आरोपीना आता पर्यंत अटक करण्यात आली होती . शिधावाटप पत्रिकाधारकांच्या तब्बल ४६२ बोगस नोंदी आढळून आल्या आहेत .
यातील आरोपी चंद्रप्रकाश चोहान हा भाजपाचा काशीमीरा मंडळ अध्यक्ष आहे . शिवाय भाजपच्या तत्कालीन नगरसेविका मीरादेवी यादव कुटुंबीयांनी ५ सदनिका - दुकाने लाटल्याची तक्रार झाली आहे . त्यातूनच गुन्ह्याचा सुरवाती पासून तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या कडे असलेला तपास काढून तो पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड यांच्याकडे दिला होता .
मात्र काशीमीरा पोलिसां कडून तपास काढून तो आता गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या कडे देण्यात आला आहे . तर तपास आर्थिक गुन्हे शाखे कडे देण्याची शक्यता वर्तवली जात होती पण आता तो गुन्हे शाखा १ कडे दिलाय . गुन्हे शाखा कडून तपासाला गती येईल अशी अपेक्षा एकीकडे वर्तवली जात आहे तर राजकीय लोकांचा सहभाग पाहता राजकीय दाबाखाली यात गुंतलेल्याना पाठीशी घातले जाईल अशी शंका सुद्धा व्यक्त होत आहे .
निरीक्षक कुराडे यांनी सांगितले कि, आपल्या कडे या गुन्ह्या बाबतची कागदपत्रे आलेली असून त्याचे अवलोकन सुरु आहे . तर महापालिका शहर अभियंता दीपक खांबित यांच्या बनावट सह्या करून सदनिका दिल्याची वितरणपत्र सापडली आहेत . त्याप्रकरणी खांबित यांनी पोलिसांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असताना पोलिसांनी अजून त्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही .