बुलेट ट्रेनसाठी बोलाविलेली बैठक अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:36 PM2018-06-02T23:36:01+5:302018-06-02T23:36:01+5:30
यापूर्वीच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती मराठीतून देण्याची केलेली मागणी याही बैठकीपूर्वी पूर्ण न केल्याने या प्रकल्पासाठी आयोजित केलेली बैठक भूमिपुत्रांनी हाणून पाडली. त्यामुळे ही बैठकदेखील रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली.
- हितेन नाईक
पालघर : यापूर्वीच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती मराठीतून देण्याची केलेली मागणी याही बैठकीपूर्वी पूर्ण न केल्याने या प्रकल्पासाठी आयोजित केलेली बैठक भूमिपुत्रांनी हाणून पाडली. त्यामुळे ही बैठकदेखील रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली. ही माहिती नेटवर ८ दिवसांत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन प्रकल्पाच्या अधिकाºयांनी दिले. तरी भूमिपुत्रांचे समाधान झाले नाही. त्यांनी विरोध कायम ठेवल्याने हा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला.
माझी जमीन बुलेट ट्रेनसाठी जाणार असल्याबाबत माझ्याशी कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला नसताना, माझ्या गैरहजेरीत माझ्या जमिनीत शिरून खुंटे मारणाºया बुलेट ट्रेन्सच्या अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पालघरमधील शेतकरी पंढरीनाथ घरत, दशरथ पुरव यांनी बैठकीत केली.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प अंतर्गत पर्यावरण आणि सामाजिकविषयक सल्लामसलतीची बैठक आज जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पालघरच्या स. तु. कदम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान बुलेट ट्रेनविरोधातील उपस्थित आंदोलनकर्त्यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरून ती बैठक रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकाºयांनी घोषित केले होते.
आज बैठकीच्या सुरुवातीलाच संघर्ष समितीचे रमाकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवून बुलेट ट्रेनबाबतची पर्यावरणीय परिणाम मसुद्याची माहिती मराठीत सर्व ग्रामपंचायतींना पुरविण्यात आली नसल्याचा मुद्दा समोर ठेवला.