जिल्हा कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक
By admin | Published: October 22, 2015 12:05 AM2015-10-22T00:05:58+5:302015-10-22T00:05:58+5:30
पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे कामकाज प्रभावी तसेच गतिमान होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय मूळ जागेतून (मुख्यालय) सुरू होणे अत्यावश्यक असून प्रत्येक विभागाने
पालघर : पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे कामकाज प्रभावी तसेच गतिमान होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय मूळ जागेतून (मुख्यालय) सुरू होणे अत्यावश्यक असून प्रत्येक विभागाने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी मंत्रालयात याबाबत बैठक होणार असून त्यात पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय समस्यांबद्दल अहवाल सादर करायचा आहे. याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पालघर पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, उपायुक्त भाऊसाहेब दांगट, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५६ कार्यालयांचा आढावा घेताना महसूल, आरोग्य, गृह, कृषी, शिक्षण याबरोबरच अन्य महत्त्वाच्या कार्यालयांसाठी आवश्यक पदांची निर्मिती प्राधान्याने करण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन पाठपुरावा करण्याचे आदेश आयुक्त सत्रे यांनी दिले. तसेच ठाण्यातून ज्या कार्यालयांचा कारभार सुरू आहे, तो लवकरात लवकर पालघरमधून सुरू व्हावा, असेही ते म्हणाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी प्रशासकीय संकुल व शासकीय अधिकारी, कर्मचारी यासाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांच्या आराखड्यांचेही सादरीकरण केले. (वार्ताहर)