वसईत शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:41 AM2020-02-03T00:41:53+5:302020-02-03T00:43:46+5:30
शेतकऱ्याने पीक पिकवल्यानंतर त्याला पुढील खर्चाच्या तरतुदीसाठी लागलीच पैशांची निकड भासते.
बोईसर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण कर्ज योजनेच्या माहितीसाठी तसेच शेतमाल जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना तारण कर्ज वाटपासाठी शिवणसई येथील तालुका सहकारी भात गिरणीच्या आवारात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प. सदस्य कृष्ण माळी, बाजार समितीचे सभापती रमेश वझे, उपसभापती अशोक कोलासो, सचिव विलास पाटील, संचालक पांडुरंग पाटील, सदानंद पाटील, अरुण पाटील, माजी पं.स. उपसभापती नरेंद्र पाटील यांच्यासह सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व शेतकरी हजर होते.
शेतकऱ्याने पीक पिकवल्यानंतर त्याला पुढील खर्चाच्या तरतुदीसाठी लागलीच पैशांची निकड भासते. या वेळी शेतकरी गरजेपोटी आपला शेतमाल पडेल त्या भावाने व्यापाºयांना देऊन आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. अशामुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा दर बाजारभावाप्रमाणे मिळत नसल्याने त्याचे आर्थिक नुकसान होते.
हे टाळण्यासाठी शेतमाल तारण ठेवून बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकरी कर्ज म्हणून उचलू शकतो व आपली निकड भागवू शकतो. हे कर्ज शेतकऱ्याला वार्षिक सहा टक्के दराने देण्यात येते. तसेच सहा महिन्याच्या अवधीत त्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही बाजारभावाप्रमाणे ठरवून एक तर त्याला टर्न ठेवलेल्या शेतमालाची उर्वरित रक्कम घेण्याचा किंवा त्याने घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करून शेतमाल पुन्हा ताब्यात घेण्याचा पर्याय उपलब्ध होतो, असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.